esakal | Gandhi Jayanti 2021 : सुदर्शन समाजासाठी बांधा विहीर
sakal

बोलून बातमी शोधा

गांधी जयंती विशेष : सुदर्शन समाजासाठी बांधा विहीर

गांधी जयंती विशेष : सुदर्शन समाजासाठी बांधा विहीर

sakal_logo
By
केतन पळसकर

नागपूर :‘या हरिजनांच्या वस्तीतील लोकांना साधे पाणीही मिळत नाही. यांना कोणी घरी बोलावीत नाही. त्यांना कोणी हात लावत नाही. त्यांची सावलीसुद्धा माणसाला नको वाटते. यांच्यासाठी यांच्याच परिसरामध्ये एक विहीर बांधण्यात यावी’ या सुदर्शन समाजाप्रती असणाऱ्या काळजी पोटी महात्मा गांधींनी स्थानिक प्रशासनाला सूचना करीत बोरकरनगरमध्ये विहीर बांधायला लावली. याच विहिरीने त्या काळी या समाजाची तहान भागविली होती. आजही सुदर्शन समाजातील या नागरिकांचे बोरकरनगर परिसरामध्ये वास्तव्य आहे.

आजच्या काळाच्या उलट परिस्थिती त्या काळी पाहायला मिळत होती. उच्च वर्णीयांकडून अतिशय तुच्छ वागणूक या समाजाला मिळायची. ना पुरेसा कामाचा मोबदला, ना खायला पुरेसे अन्न अशी बिकट अवस्था असल्याने विहीर बांधणेही त्यांना शक्य नव्हते. तर दुसरीकडे गावातील गटार आणि परिसर स्वच्छ करता करता या लोकांचे शरीरच अस्वच्छ होत असते. यांचे होणारे हाल महात्मा गांधीना बघेनासे झाले आणि त्यांनी १९३३ साली ही विहीर या समाजासाठी खुली केली.

सुदर्शन समाजाला उच्च वर्णीयांकडून त्या काळी मिळणारी अपमान जनक वागणूक पाहता या पिढीला घडविण्याचे या विहिरीचा मोठा हातभार आहे. आजही या विहिरीला बाराही महिने मुबलक पाणी असते. मध्यंतरी प्रशासनाने विहिरीच्या आजूबाजूला तटबंदी बांधली. मात्र, ही बाब पुरेशी नसून समाजासाठी ही विहीर विहीर अनन्य साधारण महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे, दस्तुरखुद राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुढाकारातून ही विहीर बांधण्यात आल्याने याला राष्ट्रीय स्मारक म्हणून दर्जा मिळावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. शहराच्या मध्यभागी गांधीजींच्या चरण स्पर्शाने पावन झालेला हा परिसर आणि ही विहीर नागपूरला मिळालेल्या वारशापैकी एक आहे.

नूतनीकरणाचे केलेले काम दर्जाहीन आहे. पूर्वी येथे गार्डन होते. याच धर्तीवर या परिसराचे सौदर्यीकरण व्हायला हवे. विहिरीमध्ये गडर लाइनचे पाणी मिसळल्या गेल्याने पाण्याचा वापर काही काळापासून बंद आहे. ही विहीर रहिवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. राष्ट्रीय स्मारक म्हणून शासनाने घोषित करावी.

-गोलू बढेल, रहिवासी

loading image
go to top