
Nagpur News : आयटीआय आधुनिकीकरणासाठी बाराशे कोटी; मंगलप्रभात लोढा
नागपूर : राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांचे विद्यावेतन ४० रुपयांवरुन ५०० रुपये करण्यात येईल. तसेच या आयटीआयच्या नूतनीकरणासाठी बाराशे कोटींचा प्रस्ताव आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधान परिषदेत सोमवारी दिली.
विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आहे. तीन महिन्यात त्याला मंजुरी घेऊन अंमलबजावणी करू, असेही ते म्हणाले. या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात १९८२ पासून वाढ झाली नाही, असेही त्यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
आयटीआयचे नूतनीकरण बाराशे कोटींची तरतूद
राज्यात ४१९ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) असून यातील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आयटीआयचे नूतनीकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी १२०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून आभासी वर्ग (व्हर्चूअल क्लास रुम), ग्रंथालय, जीम अशा विविध सुविधा देण्यात येईल.
येत्या सहा महिन्यात याबाबत अंमलबजावणी होईल, असेही मंत्री लोढा यांनी यावेळी उपप्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. या चर्चेत एकनाथ खडसे, प्रविण दरेकर, सतीश चव्हाण, सचिन अहिर, शशिकांत शिंदे, श्रीकांत भारतीय, अभिजीत अरुण लाड आदींनी सहभाग घेवून उपप्रश्न उपस्थित केले होते.