शिक्षण सुटले अन हाती आले कुदळ-फावडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

many student drop education due to poverty nagpur

शिक्षण सुटले अन हाती आले कुदळ-फावडे

नागपूर : गोंड वस्तीत शाळा नसली तरी जवळपास दोन-तीन शाळा आहेत. मात्र इथली मुले घाणेरडी, अंघोळ करत नाहीत, व्यसनी आहेत, असा समज असल्याने या मुलांना शाळेत घेत नाहीत. मात्र, सर्व शिक्षा अभियानातून शिक्षण बंधनकारक झाले. यामुळे येथील बालकांची काहींची नावे शाळेत नोंदवली गेली. त्यातील एक मुलगा दहावी पास झाला. पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतला. दोन वर्षे शिकला पण पैशाअभावी शिक्षण सुटले अन हातात कुदळ फावडे आले. शिक्षणासाठी अनेकांच्या हातापाया पडला परंतु व्यर्थ. गरीब होतकरू आदिवासी मुलांकडे ना शासनाच्या आदिवासी विभागाची नजर गेली ना समाजाची.

नाव पहलात धुर्वे. दहावी झाल्यानंतर केडिके पॉलिटेक्निकमध्ये (सिव्हिल) प्रवेश घेतला. शिक्षण सुरू असतानाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कमावता भाऊ गेला. सहा जण खाणारे. घरची जबाबदारी आली. सिव्हिल इंजिनिअर (पदविका) होण्याचे पहलातचे स्वप्न भंगले. हातात चऱ्हाट अन कुऱ्हाड आली. झाडे तोडण्याचे काम करून गुजराण करायचे ठरवले. परंतु, पुढे हे ही काम सोडावे लागले.

आता हातमजुरीतून मिळणाऱ्या पैशावर चूल पेटते. पहलात २५ वर्षांचा झाला. हातमजुरीच्या कामावर जातो. लग्न झाले. पहलातसारखी आर्थिक दुर्बलतेमुळे शिक्षणापासून दुरावलेली आणि व्यसनाच्या विळख्यात सापडली मुले येथे दिसतात. मेकाडू धुर्वे हा काही वर्ग शिकला. आता दगड फोडतो. राहुल उईके आयटीआयमध्ये कौशल्याचे प्रशिक्षण घेत आहे. सेवक उईके नावाचा मुलगा नववीत आहे. गोंड वस्तीतील आकाश उईके हाच एक पदवीधर युवक आहे पण बरोजगार आहे. गोंड वस्तीतील प्रत्येक युवकांची कथा ऐकल्यानंतर हृदय हेलावून जाते. येथील आदिवासी तरुणांच्या बेरोजगारीचा आणि त्यांच्या पोटातील भुकेच्या वेदनांचा आवाज आदिवासी विभागापर्यंत कधी पोहचेल, हेच कळायला मार्ग नाही.

पहलात म्हणतो, ‘सार्थक’ ला शिकवणार...

माझे शिक्षण सुटले पण माझा मुलगा सार्थकला शिकवणार आहे. त्याला मोठा सायेब करणार...हे सांगताना पहलातचे डोळे पाणावले. वस्तीतील युवकांच्या हक्कांचा लढा याच वस्तीतील तुफान उईके लढत आहे.

पोटभर जेवून ढेकर देणारे सारे सुखी आहेत. वंचित समाज अजूनही मुख्य प्रवाहात आला नाही. गोंड वस्तीतील तरुणांना रोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी आदिवासी विभाग आहे. या गोंड वस्तीतील तरुण आदिवासी विभागात जाऊ शकत नाही, मात्र आदिवासी विभागातील अधिकारी गोंड वस्तीला भेट देवू शकतात. वस्ती भेट योजनेचा लाभ आदिवासींना मिळवून देता येईल.

- इ.झेड.खोब्रागडे, माजी सनदी अधिकारी, नागपूर

Web Title: Many Student Drop Education Due To Poverty Nagpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..