‘सगळं अशुभ,अमंगळ... घेऊन जा ऽऽ गे मारबत ऽऽऽ!’ फक्त नागपुरातच साजरा होणारा अनोखा मारबत!

मारबत!, हा सोहळा संपूर्ण भारतात फक्त नागपुरातच साजरा होतो.
Marbat Nagpur Cultural Festival history of 143 years tanha pola
Marbat Nagpur Cultural Festival history of 143 years tanha polaSakal

- अपर्णा विचोरे-आठल्ये

‘सगळं अशुभ,अमंगळ... घेऊन जा ऽऽ गे मारबत ऽऽऽ!’ या आरोळ्यांनी दरवर्षी ''तान्ह्या पोळ्या'' च्या दिवशी आमच्या नागपूरातला महाल - इतवारी भाग दुमदुमुन गेलेला असतो. मारबत!, हा सोहळा संपूर्ण भारतात फक्त नागपुरातच साजरा होतो. मारबत ही आम्हा नागपूरकरांची अशी ग्रामदेवता आहे की, ती या गावावर येणारी सगळी संकटे, आपल्या सोबत दूर घेऊन जाते आणि विसर्जित होते.

मूळात मारबत ही प्रथा मध्य प्रदेशातील काही आदिवासी जमातीत दिवाळीच्या रात्री पाळली जाते. विशिष्ट आकारातली मातीची मूर्ती इडा-पीडा,अमंगलतेचे प्रतीक म्हणून गावाबाहेर ढकलत नेतात. पण मग ही प्रथा खूप वेगळ्या स्वरूपात नागपुरात कशी रुजली?

यामागचा इतिहास असा की, महाराणी बाकाबाई भोसले या नागपूरकर भोसल्यांच्या राणीने इंग्रजांशी तथाकथित हातमिळवणी केली. त्यामुळे नागपूरचे समाजमानस क्षुब्ध झाले. या घडल्या घटनेचा मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यासाठी बाकाबाईला स्वार्थी, देशद्रोही ठरवून त्यांचे प्रतीक म्हणून ''काळ्या मारबती ''चा जन्म झाला.

तसेच त्यांचे पती- रघुजीराजे भोसले (दुसरे ) यांनी त्यांना रोखले नाही म्हणून त्यांचे प्रतीक बडग्याच्या रूपाने अवतरले. पुढे इंग्रजांना नामोहरम करण्यासाठी कर्तबगार बाकाबाई भोसल्यांची ती रणनीती होती हे सिद्ध झाले.

पण सुरू झालेली प्रथा बंद पाडणं नागपूरकरांना मानवलं नाही.मग मारबत ही दुष्टता, अमंगळ रूढी यांचे वहन करून स्वतः सोबत घेऊन जाणारी देवता म्हणून जनमानसात रुजली आणि आता वर्षानुवर्षे ही प्रथा पाळली जाते. तर, विविध सामाजिक समस्या, अनिष्ट रूढी, परंपरा यांचं प्रतीक म्हणून पिवळी मारबत निघते.

विविध निषेधार्ह राजकीय, सामाजिक विषयांवर लक्षवेधी बडगे निघतात आणि विसर्जित होतात. दरवर्षी कुठले बडगे निघणार, या विषयी जनतेच्या मनात अपार कुतूहल असते. सदाशिवराव ताकीतकर आणि ताबुतकार गणपतराव शेंडे यांनी पिवळी मारबत १८८५मध्ये साकारली, तर काळी मारबत त्याही आधी सुमारे १८८१ च्या सुमारास निर्माण झाली.

आजही ताकीतकर आणि शेंडे घराण्यातले सदस्य मारबती साकारतात. पतंगीचे ताव, बांबूच्या कमच्या यापासून दोन भव्य मूर्ती साकारतात. दोन्ही मारबती आणि बडग्यांचे विधीवत पूजन करून दुपारी मिरवणूक निघते, इतवारीतील शहीद चौकात (जिथे इंग्रजांच्या गोळीबारात १९४२ साली ५ जण ठार झाले होते.)

काळी मारबत आणि पिवळी मारबत एकत्र येतात, त्यानंतर खरी मिरवणूक सुरू होते. त्यानंतर संध्याकाळी त्या सर्वांचं नाईक तलावात विसर्जन होते. मारबतींचे स्वरूप परंपरागत असले तरी बडगे मात्र नवनवीन रूपात अवतीर्ण होतात. देशभरात एकमेवाद्वितीय असलेल्या या उत्सवात प्रचंड जनसमुदाय सहभागी झालेला असतो.

पूर्वी मारबत महोत्सव थोडा बिभत्सतेकडे झुकलेला होता. त्यामुळे मारबत मिरवणुकीत जाणे हीन अभिरुचीचे मानले जायचे. पण आता परिस्थिती बदलली आहे. भारतातला हा एकमेव उत्सव आपल्या गावात संपन्न होत असतो, तसेच त्या मागे उदात्त हेतू आहे.

'' हे लक्षात आल्याने आता मारबत मिरवणुकीतील असभ्यता बऱ्यापैकी कमी झालेली आहे. कित्येक भाविक स्वतःच्या समस्या दूर व्हाव्यात म्हणून मारबतीला नवस बोलतात.वर्षानुवर्षे प्रचंड उत्साहात हा सोहळा साजरा होतो, होत राहील. तेव्हा आपणही या मारबत सोहळ्यात सहभागी होऊ आणि म्हणूयात -

‘मना मनातली अस्वस्थता, हेवेदावे,भीती, रोगराई घेऊन जाऽ गे मारबतऽऽऽ!’

तान्हा पोळा

विदर्भात सर्वत्र मारबत निघत नाही, मात्र ''तान्ह्या पोळ्या '' ला गावोगाव झडत्या देणे आणि बोंबाबोंब असा कार्यक्रम असतोच. झडत्या देणं म्हणजे गावातील एखाद्याचा यमक जुळवून काव्यात्म निषेध व्यक्त करणे. त्यात थोडा आचरटपणा ही डोकावतो. तो आजच्या दिवशी क्षम्य असतो.

गावगाड्यात वर्षभरात कधीतरी, काहीतरी मनाविरुद्ध घडलेलं असतं त्याचंच उट्ट फेडले जाते. भांडणात धमकीही दिली जाते,'' थांब तुझ्या नावानं तान्ह्या पोळ्याले झडत्या देतो का नाय ते बघ! '' बस्स! '' तान्हा पोळा '' हा सुद्धा फक्त नागपूर येथेच सुरू झालेला आणि पुढे विदर्भात सर्वत्र पसरलेला सण आहे. इसवीसन १८०६ मधे रघुजी राजे भोसले यांनी ''तान्ह्या पोळ्या ''ची प्रथा सुरू केली. पोळ्याचा दुसरा दिवस म्हणजे मौज-मस्तीचा, आरामाचा दिवस असतो. आजही विदर्भात गावोगाव लाकडी बैलांचा बाजार भरतो.

नागपूर, मो. ९८२२७०१०६२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com