

Struggles That Shaped a Movement: Anil Wasnik Reflects on Midnight Protests
Sakal
-केवल जीवनतारे
नागपूर: ‘नामांतर’ आंदोलनाच्या काळात दंगली, पोलिसी दडपशाही आणि भयावह परिस्थितीला सामोरे जात कार्यकर्त्यांनी सोळा वर्षे लढा दिला. ‘कार्यकर्त्यां’च्या रक्ताने लिहिलेले नामांतर लढ्याचे विजयी ‘पेज’ मध्यरात्रीच्या मोर्च्यांनी चेतवले होते. अखेर १४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ हे नाव देण्यात आले. या संघर्षाच्या आठवणी वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला नामांतर आंदोलनातील कार्यकर्ते अनिल वासनिक यांनी जागवल्या.
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याचा ठराव २७ जुलै १९७८ रोजी पारीत झाला. हा आनंद आंबेडकरी अनुयायी अनुभवत असतानाच प्रतिगाम्यांनी कुटिल डाव साधला. सरकारच्या निर्णयाला जातीचा रंग दिला गेला. दलितांच्या घरांची राखरांगोळी करण्यास सुरुवात झाली. याविरोधात पेटून उठलेल्या आंबेडकरी कार्यकर्त्यांनी डोक्याला निळे कफन बांधून ४ ऑगस्ट रोजी दीक्षाभूमीवरून प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वात ‘लाँगमार्च’ काढला. त्यात मामा सरदार, कवी इ. मो. नारनवरे, सुरेश घाटे, बबन बोंदाटे, जगदीश थूल, थॉमस कांबळे, जे. के. नारायणे, गोपाळराव आटोटे, नामदेवराव खोब्रागडे, दिलीप पाटील, भिवा बडगे, सरोज मेश्राम यांच्यासारखे लढाऊ कार्यकर्ते सहभागी झाले होते. महाराष्ट्र समाजवादी युवक संघटना आणि युवक क्रांती दलाने सरकारला जागे करण्यासाठी मध्यरात्री मोर्चे काढण्याची मोहीम राबवली होती. नामांतराचा ठराव झाला त्याच २७ जुलै १९७८ ला मध्यरात्री मोर्चा काढून युक्रांदने सरकारची झोपमोड केली होती,
महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला ५ डिसेंबर १९७९ रोजी मध्यरात्री ‘बारा’च्या ठोक्याला नागपूरहून मशाल मोर्चा काढण्यात आला. मध्येच मोर्चा अडवून कार्यकर्त्यांना पोलिस लाइन टाकळीच्या बॅरेकमध्ये कोंबले. एकाच वर्षी ३ मोर्चे मध्यरात्री काढण्यात आले होते. मध्यरात्रीच्या मोर्चाचे श्रेय वासनिक यांच्यासह शंकर ढेंगरे, लीलाधर मेश्राम, मधुकर रामटेके, अशोक पाटील, अर्जुन गजभिये, अनिल मेश्राम, हंसा रामटेके, गणेश टेंभूर्णे, ओमप्रकाश मोटघरे, रूपचंद्र गद्रे, युवराज फुलझेले, हुसेन फुलझेले, कविराज बोरकर यांना जाते.
नामांतर आंदोलनाची चळवळ क्रांतिबीजे रोवणारी चळवळ होती. बाबासाहेबांमुळे आम्ही डोकं वर करून जगत आहोत. म्हणूनच मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर आंदोलन हा आमचा श्वास बनला होता. यामुळे आंदोलनाची धग अखेरपर्यंत कायम राहिली होती.
- अनिल वासनिक,
नामांतर लढ्यातील कार्यकर्ते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.