विस्तारासाठी मनसेला पदाधिकारी सापडेना! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MNS office bearers expansion

विस्तारासाठी मनसेला पदाधिकारी सापडेना!

नागपूर : राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्ह्यातील संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त केली असली तरी पक्षाला अपेक्षित सक्षम व दमदार पदाधिकारीच सापडत नसल्याने नवी कार्यकारिणी रखडली आहे.

राज ठाकरे यांनी मनसेच्या पुनर्बांधणीसाठी संपूर्ण विदर्भाचा दौरा केला. १७ वर्षांत पक्ष का वाढला नाही याचा आढावा घेतला. या मागची कारणे जाणून घेतली. त्यांच्या विश्वासू चमूने तीन दिवस आधी विदर्भात मुक्काम ठोकूण सर्व माहिती जाणून घेतली. पक्षाच्या अधोगतीचा सर्व ठपका तत्कालीन कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांवर ठेवला. राज ठाकरे नागपूरला आले. बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नागपूर व शहर जिल्हा कार्यकरिणी बरखास्त करण्याची घोषणा केली. हा विद्यमान पदाधिकाऱ्यांना इशाराच होता.

नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या तारखेनुसार मुंबईला बैठक घेतली. नागपूर शहरात दोन अध्यक्ष आणि ग्रामीणमध्ये एक अशा तीन अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली. नवरात्रीत या सर्व घडामोडी घडल्या. दसरा आटोपल्यावर विस्तार करण्याचे ठरवण्यात आले होते. शहरात विशाल बडगे यांना तीन तर चंदू लाडे यांना प्रत्येकी तीन मतदारसंघाचे अध्यक्ष करण्यात आले. या माध्यमातून दोन गटांना खुश केले. ग्रामीणमध्ये मात्र आदित्य दुरुगकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे फक्त दोनच मतदारसंघ सोपवण्यात आले. उर्वरित चार मतदारसंघाला सध्या अध्यक्षच नाही. त्यावर एकमतसुद्धा होत नसल्याचे समजते.

मोजकेच सक्षम कार्यकर्ते

राज ठाकरे यांचे विश्वासू संदीप प्रधान आणि अविनाश जाधव येत्या चार-पाच दिवसात नगपूरला येणार आहेत. त्यात शहर आणि ग्रामीणच उर्वरित कार्यकारिणी जाहीर केली जाणार असल्याचे एका मनसेच्या नेत्याने सांगितले. सक्षम कार्यकर्ते मोजके आहेत. ही अडचण आहेच, मात्र त्यातून मार्ग काढण्यात येईल. नव्या व जुन्यांना सोबत घेऊन पक्षाचे कार्य दमदारपणे सुरू केले जाणार असल्याचे त्याने सकाळ सोबत बोलताना सांगितले.

टॅग्स :NagpurRaj Thackeraymns