MSCRT : ‘लालपरी’ला यायला लागले वीस वर्ष? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSCRT st bus service start in Hingna Dhokarda Village

MSCRT : ‘लालपरी’ला यायला लागले वीस वर्ष?

हिंगणा : तालुक्यातील शेवटच्या सीमेवर असलेल्या धोकुर्डा गावातील नागरिकांची मागील २० वर्षांपासूनची मागणी १ ऑक्टोबरला राज्य परिवहन महामंडळाची `लालपरी’ या गावात पोहचली. त्यामुळे ग्रामस्थांनी जल्लोषात ‘लालपरी’चे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

जि.प.च्या महिला व बाल कल्याण सभापती उज्वला बोढारे यांच्या प्रयत्नाने या गावात बससेवा सुरू झाल्याने धोकुर्डावासींनी त्यांचे आभार मानले. मागील पंधरा ते वीस वर्षापासून धोकुर्डा सावळीबीबीच्या जनतेला विशेषतः येथील विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला भगिनी व पुरुष मंडळींना कान्होलीबारा व हिंगणा येथे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरीता येण्या जाण्यास मोठी अडचण निर्माण व्हायची.

त्यांना दैनंदिन कामासाठी जसे किराणा, भाजीपाला व इतर लोकपयोगी साहित्याकरीता विविध वस्तू घेण्याकरीता कान्होलीबारा व हिंगणा येथे येण्या जाण्याकरीता स्वतःच्या साधनाशिवाय इतर कोणतीही साधने उपलब्ध नव्हती. त्यांची ही मागणी या भागाच्या जि.प.सदस्य व जि.प.महिला व बालकल्याण सभापती उज्वला बोढारे यांनी परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मान्य करवून घेतली. १ऑआक्टोबर रोजी धोकुर्डा येथे ‘लालपरी’ला हिरवी झेंडी दाखवून रितसर उद्घघाटन करण्यात आले.

यावेळी पं.स.सभापती रूपाली खाडे तसेच गावातील अनेक महिला, पुरुष, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. त्यांची ही मागणी मागील पंधरा-वीस वर्षापासून असून मागणी पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंदोत्सव व आभार व्यक्त केले. यावेळी बसवाहक व बसचालक तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून बसला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी आनंदराव खोबे, कवडू पिंपळे, भारत शेट्टे, सुनील भांडेकर, आशीष पिंपळे, अमृत पिंपळे तसेच युवा विकास संस्था पदाधिकारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.