MSRTC : एसटीच्या गळतीवर ‘ताडपत्री’ उपाय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSRTC ST bus bad condition roof leakage

MSRTC : एसटीच्या गळतीवर ‘ताडपत्री’ उपाय?

नागपूर : पावसाळ्यात तुम्ही जरी एसटीने प्रवास करीत असाल तर सोबत छत्री सुद्धा बाळगा. असाच अनुभव या पावसाळ्यात बऱ्याच प्रवाशांना आला आहे. एसटीच्या छतावरून पाणी गळत असल्याने प्रवाशांना बसमध्ये त्रास सहन करावा लागत आहे. महामंडळ प्रशासनाने एसटीच्या गळतीवर ताडपत्रीचा उपाय शोधून काढला. ज्या ठिकाणी गळत असेल तेथे तात्पुरते ‘पॅचेस’लाऊन काम भागविल्या जात आहे.

वेळ दुपारी ३.४५ वाजताची. पुसद आगाराची नागपूर-पुसद बस गणेशपेठ मध्यवर्ती बस स्थानकावर आली. पावसाच्या पाण्याची गळती रोखण्यासाठी त्या बसच्या छताला ताडपत्री सारखे प्लॅस्टिकचे ‘पॅचेस’ लावण्यात आले होते. आधी स्टीकर पट्टी छताला चिकटविण्यात येत होती. मात्र, ऊन तसेच काही दिवसांनी हे ‘पॅचेस’ तडकते. त्यातून पुन्हा पाण्याची गळती सुरू होते. गळतीचा हा जरी कायम उपाय नसला तरी एसटी महामंडळाच्या बहुतांश बसेसची स्थिती सध्या चांगली नाही.

राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)कडे असणाऱ्या बसेसची समस्या वाढत चालली आहे. रात्रीला गाड्यांची हेड लाईटची समस्या, अचानक गाडी ब्रेक डाऊन होणे, पावसात काचावरील वायफरची समस्या, धक्काप्लेट होणाऱ्या गाड्या, बसच्या सीटची दयनीय अवस्था अशा समस्या बहुतांश एसटी बसमध्ये उद्भवू लागल्या आहेत. त्यामुळे प्रवासात प्रवाशांना याचा बरेचदा फटका बसत आहे.

देखभाल-दुरुस्तीचा अभाव

कोरोना आणि संपामुळे एसटीचे पुरते कंबरडे मोडले आहे. त्यातून सावरता-सावरता महामंडळाच्या नाकीनऊ आले आहे. सर्वात महत्त्वाचे प्रवाशांना उपलब्ध करून देणारी चांगली वाहने एसटीकडे नाही. जुन्या झालेल्या गाड्यांमुळे देखभाल-दुरुस्तीवर मोठा खर्च महामंडळाला आहे. मात्र, तरीही बहुतांश गाड्यांमध्ये देखभाल-दुरुस्तीचा अभाव आहे. याचा परिणाम प्रवाशांवर होत असून एसटीपेक्षा प्रवाशांना जास्त ओढा खासगी ट्रॅव्हल्सकडे असल्याचे दिसून येत आहे.

जनतेच्या सेवेसाठी महामंडळाची स्थापना झाली आहे. त्यामुळे सुस्थितीमध्ये गाड्या देणे ही महामंडळाची जबाबदारी आहे. गेल्या दोन वर्षापासून नव्या गाड्या खरेदी करण्यात आल्या नाहीत. गळती रोखण्यासाठी ताडपत्री सारखा तात्पुरता उपाय करून चालणार नाही. सरकारनेही अर्थ साहाय्य करून यात नियोजन करण्याची गरज आहे.

- मुकेश तिगोटे,सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)