पावसामुळे म्युकरमायकोसिस रुग्ण वाढणार? काय म्हणातात वैद्यकीय तज्ज्ञ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mucormycosis

म्युकरमायकोसिस रुग्ण वाढणार? काय म्हणातात वैद्यकीय तज्ज्ञ

नागपूर : शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटत असतानाच इतर आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे वास्तव आहे. वातावरणातील बदलामुळे इतर आजारासोबतच कान, नाक व गळ्यांमध्ये होणाऱ्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे दिसून येत आहे. वातावरणातील बदल व आद्रतेमुळेही आता बुरशीजन्य आजार असलेल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. पुढे त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे. (Mucormycosis-Rainy-Days-Fungal-diseases-Medical-expert--nad86)

वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सध्याच्या घडीला म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या कमी असली तरी चिंतामुक्त होऊन चालणार नाही. आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. या दिवसांत वातावरणातील आद्रता जास्त असते. वातावरणात दमटपणा असतो. यामुळे सामान्य व्यक्तींनाही बुरशीची समस्या उद्भवते. सोबतच म्युकरमायकोसिसचे रुग्णही वाढू शकतात.

ज्यांना पूर्वीपासूनच ही समस्या आहे, त्यांनाही त्रास होऊ शकतो. मेडिकलच्या ईएनटी विभागात म्युकरमायकोसिचे अनेक रुग्ण भरती आहेत. आजघडीला शहरातील मेडिकल, मेयो या शासकीय रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसचे ५० वर रुग्ण भरती आहेत. यासोबतच इतर आजाराच्या रुग्णांचीही संख्या वाढली आहे. ईएनटी विभागात रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी एकच शस्त्रक्रिया कक्ष आहे. आपातकालीन कार्य, न्यूराटॉमी, सामान्य शस्त्रक्रिया व इतर नियोजित शस्त्रक्रियाही त्यातच करण्यात येतात.

यात अनेकदा रुग्णांना म्युकरमायकोसिसची शस्त्रक्रिया आदींसाठी शस्त्रक्रिया कक्षाची गरज असते. शस्त्रक्रिया कक्षात एका दिवसात २ ते ३ शस्त्रक्रियाच होऊ शकतात. जेव्हाकी दिवसभरात किमान ५ ते ७ शस्त्रक्रिया होत आहे. यामुळे रुग्णांचा दबाव वाढला असल्याचे मेडिकल प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

(Mucormycosis-Rainy-Days-Fungal-diseases-Medical-expert--nad86)

टॅग्स :mucormycosis