esakal | निर्बंधात शिथिलता सोमवारपासून? व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर फुलणार हास्य
sakal

बोलून बातमी शोधा

निर्बंधात शिथिलता सोमवारपासून? चेहऱ्यावर फुलणार हास्य

निर्बंधात शिथिलता सोमवारपासून? चेहऱ्यावर फुलणार हास्य

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर : दीड वर्षापासून लॉकडाऊन, निर्बंधासह व्यवसायाने कोमेजलेले व्यावसायिकांचे चेहरे सोमवारपासून फुलण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केल्याने उत्साहाचा श्रावण व्यावसायिकांसाठी तसेच व्यवसायावर उपजीविका करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी उत्साह घेऊन येणार आहे. (lockdown-Unlock-Restraint-relaxation-Nagpur-Corona-Rajesh-Tope-nad86)

मागील वर्षी मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा झाली. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने विविध व्यवसायाला सरकारने परवानगी दिली. परंतु, परवानगी दिल्यानंतर निर्बंधाची वेसण घातली होती. यात शिथिलता येईल, या आशेवर व्यापारी, लहान-मोठे दुकानदार होते. राज्य सरकारने निर्बंध हटविण्यासाठी वेगवेगळ्या लेवल जाहीर केल्या. शहरात तिसऱ्या लेवलनुसार दुकाने रात्री आठपर्यंत तर हॉटेल्स रात्री दहापर्यंत सुरू करण्यात आले होते. परंतु, हा आनंद केवळ आठवडाभरच टिकला.

हेही वाचा: अमरावती : वाहनातून साडेतीन कोटींची रक्कम पकडली, सहा जण ताब्यात

आठवड्याभरातच डेल्टा प्लस रुग्णाच्या वाढीमुळे दुकाने, हॉटेल्सच्या वेळा चारपर्यंत करण्यात आला. शहरात पॉझिटिव्हिटी दर एकपेक्षा खाली असूनही निर्बंधात शिथिलता आणली जात नसल्याने शहरातील व्यापाऱ्यांत चांगलाच असंतोष निर्माण झाला होता. लहान-मोठे दुकानदार, व्यापारी संघटनांनी सरकारविरुद्ध बिगुल फुंकला. दोन दिवस शहरातील व्यापाऱ्यांनी आंदोलन केले. एवढेच नव्हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारला पत्र लिहिले. यानंतर उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडूनही सकारात्मक चिन्हे मिळाली. त्यानंतर व्यापारी, दुकानदारांनाही निर्बंध शिथिल होण्याचे वेध लागले होते.

गुरुवारी सायंकाळी त्यांच्या कानावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा पडली अन् चेहऱ्यावर उत्साह दिसून आला. निर्बंधात शिथिलतेचा अंतिम प्रस्ताव सहीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात आला असून, मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर त्यावर १ ते २ दिवसांमध्ये जीआर निघेल असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सोमवारपासून निर्बंधात शिथिलता येण्याची शक्यता असून व्यावसायिक, लहान मोठे दुकानदारांच्या आशा पल्लवित झाल्या.

हेही वाचा: जुळ्या बहिणींनी वयाच्या अकराव्या वर्षी उभा केला व्यवसाय

सरकार हे करू शकते

  • दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत

  • हॉटेल, रेस्टॉरंटला रात्री ११ पर्यंत

  • मॉल ५० टक्के क्षमतेने

  • २० विद्यार्थ्यांसह ट्युशन क्लासेस

  • धार्मिक स्थळे, जलतरण तलाव बंद

  • शाळा, महाविद्यालय बंद

(lockdown-Unlock-Restraint-relaxation-Nagpur-Corona-Rajesh-Tope-nad86)

loading image
go to top