
गंगाबाई घाटाजवळ नाला स्वच्छतेला सुरुवात
नागपूर : महापालिकेने अखेर गंगाबाई घाटाजवळील हत्तीनाल्याच्या स्वच्छतेला शुक्रवारपासून सुरुवात केली. पहिल्याच दिवशी चारशे मीटर पात्रातील गाळ काढण्यात आला. उद्यापासून नाग नदीकडून गंगाबाई घाट पात्रातील गाळ काढण्यात येणार आहे. गंगाबाई घाट येथील हत्तीनाल्याच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याबाबत ‘सकाळ’ने १७ मे रोजी ‘गंगाबाई घाटजवळील नाला स्वच्छतेच्या प्रतीक्षेत’ या मथळ्यासह ठळकपणे वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. गजेंद्र महल्ले नाल्याच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. त्यांनी या नाल्याच्या स्वच्छतेबाबत झोन अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
एवढेच नव्हे आजपासून सुरू झालेल्या स्वच्छतेदरम्यान स्वतः हजेरी लावली. शुक्रवारी पहिल्याच दिवशी चारशे मीटर पात्र स्वच्छ करीत नाल्यातील गाळ काढण्यात आला. या नाल्यासह पूर्व नागपुरातील नाल्याचे खोलीकरण व स्वच्छतेलाही वेग आला आहे. येत्या दोन दिवसांत हत्तीनाल्याच्या संपूर्ण पात्रातून गाळ काढण्यात येणार असल्याचे डॉ. गजेंद्र महल्ले यांनी नमुद केले.
१४० नाल्यांची स्वच्छता
महापालिकेने नदी, नाले स्वच्छतेची मोहीम सुरू केली. आतापर्यंत २२७ पैकी १४० नाल्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. २६ नाल्यांची स्वच्छता सुरू असून ६१ नाल्यांच्या स्वच्छतेलाही लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात नदी व नाल्यांची स्वच्छता पूर्ण होईल, असे डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सांगितले.
चार वर्षानंतर नाला स्वच्छ
प्रभाग क्रमांक एकमधील तिरुपतीनगरातील नाला गेल्या चार वर्षांंपासून स्वच्छ झाला नव्हता. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. यंदा नाले स्वच्छता मोहिमेंतर्गत या नाल्याची स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे येथील नागरिकांनी महापालिका आयुक्तांपासून तर घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुखांपर्यंत सर्वांचे कौतुक केले.
Web Title: Municipal Corporation Start Gutter Cleaning In Gangabai Ghat Nagpur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..