Murder In Nagpur : समता सैनिक दलाच्या पदाधिकाऱ्याचा खून; चार अल्पवयीन ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुनील रामजी जवादे

समता सैनिक दलाच्या पदाधिकाऱ्याचा खून; चार अल्पवयीन ताब्यात

नागपूर : शाळकरी मुलांना वस्तीत गांजा, ड्रग्स, दारू पिण्यास विरोध करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या समता सैनिक दलाच्या पदाधिकाऱ्याचा चाकूने भोसकून खून केला. ही थरारक व दुर्दैवी घटना गुरुवारी पाच वाजता रामबागमध्ये घडली. याप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी ४ विधी संघर्षग्रस्त मुलांना ताब्यात घेतले आहे. सुनील रामजी जवादे (४६, रा. रामबाग) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शहरात दांडगा जनसंपर्क असणारे सुनील हे समता सैनिक दलाचे निमंत्रक म्हणून कार्यरत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील जवादे हे कॉटन मार्केट येथे दलालीचे काम करीत होते. रामबाग येथील तथागत बहुउद्देशीय संस्थेचे ते सदस्य होते. दीक्षाभूमी आणि रामबाग येथे समाज प्रबोधनाचे काम करीत होते. अनेक अशिक्षित विद्यार्थी किंवा आर्थिक स्थिती बरोबर नसलेल्या नसलेल्या गरीब विद्यार्थ्यांना त्यांनी प्रवाहात आणले होते.

हेही वाचा: ...अन् मध्यरात्री आईला मुलगी प्रियकरासोबत दिसली नको त्या अवस्थेत

अंमली पदार्थ, गांजा, दारू पिणाऱ्या आणि सिगरेट ओढणाऱ्या वस्तीतील अल्पवयीन मुलांना ते व्यसन न करण्याचे धडे नेहमी देत होते. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चारही मुलांना देखील नशा न करण्याचे बजावले होते. चार ते पाच महिन्यांपूर्वी जवादे यांच्या पुतण्यासोबत विधी संघर्षग्रस्त मुलाचे भांडण झाले होते. त्यावेळी मध्यस्थी करून जवादे यांनी भांडण सोडविले होते. त्यानंतर प्रकरण शांत झाले होते.

दहा ते बारा दिवसांपासून विधी संघर्षग्रस्त मुले हे जवादे यांच्या घराकडे चकरा मारत होते. परंतु, जवादे यांनी फारसे लक्ष दिले नाही. गुरुवारी सकाळी ४.३० च्या सुमारास जवादे हे दुचाकीने कॉटन मार्केट येथे जाण्यास निघाले. घरातील गल्लीतून निघून ते मुख्य रस्त्यावर येत असतानाच विधी संघर्षग्रस्त मुलांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली.

हेही वाचा: अजबच इच्छा! एलियन बनण्यासाठी त्याने कापले नाक, कान, ओठ व बोट

अचानक झालेल्या हल्ल्याने ते दुचाकीसह पडले. तोच एका विधी संघर्षग्रस्त मुलाने चाकू काढला. जीव वाचविण्यासाठी ते तथागत बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयाकडे पळत असताना विधी संघर्षग्रस्त मुलांनी पकडले आणि एकाने पोटावर, छातीवर चाकूने वार करून ठार केले. हाकेच्या अंतरावर असलेल्या इमामवाडा पोलिसांना ही माहिती समजताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी शोधमोहीम राबवून चारही विधी संघर्षग्रस्त मुलांना ताब्यात घेतले. याप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

समता सैनिक दलाची सलामी

सुनील जवादे यांच्या हत्येची वार्ता आंबेडकरी अनुयायांमध्ये पसरताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली. अनेक सामाजिक आणि समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर कडेकोट पोलिस बंदोबस्तात मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार पार पडले. समता सैनिक दलाने जवादे यांना सलामी दिली.

loading image
go to top