
अमरावतीत व्यापाऱ्याची हत्या
अमरावती - श्यामचौक नजीकच्या हनुमान मंदिराच्या गल्लीतील घंटीघड्याळाच्या जवळ उमेश प्रल्हादराव कोल्हे (वय ५४) या व्यापाऱ्याची झालेली हत्या ही लूटमार करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याची बाब पोलिस तपासात उघड झाली आहे.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी (ता.२३) सायंकाळी दोघांना अटक केली. मुद्दस्सीर अहेमद शेख इब्राहीम (वय २२, रा. लालखडी) व शाहरुख पठाण हिदायत खान (वय २३, रा. सुफियाननगर), अशी अटक दोघा संशयितांची नावे असल्याचे शहर कोतवालीच्या पोलिस निरीक्षक नीलिमा आरज यांनी सांगितले. दोघेही सराईत म्हणून कधीही पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेले नाहीत. पहिल्यांदाच त्यांना अटक झाली. अमरावती तहसील कार्यालयाजवळ उमेश कोल्हे यांचे अमित मेडिकल स्टोअर नावाचे प्रतिष्ठान आहे. नेहमीप्रमाणे मेडिकल बंद करून श्री. कोल्हे न्यू हायस्कूल मेन जवळ हनुमान मंदिराच्या गल्लीतून घराकडे जात होते.
त्यांच्या मागे मुलगा आणि सून हे दोघे दुसऱ्या दुचाकीने येत होते. गल्लीत अंधारात तीन अनोळखी व्यक्तींनी उमेश कोल्हे यांच्यावर अचानक धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. मंगळवारी (ता.२०) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली होती. लूटमार करण्याचा तिघांचा उद्देश होता. त्यामुळे आपण साथीदारांसह दबा देऊन गल्लीत अंधारात बसलो होतो, अशी कबुली अटकेनंतर या दोघांनी दिली. परंतु मागे मुलगा असल्याने उमेश कोल्हे यांच्याकडील रोख रक्कम लुटता आली नाही, असेही हल्लेखोरांनी पोलिसांना सांगितले. तिसरा साथीदार नेमका कुठे आहे, याची चाचपणी पोलिसांनी सुरू केली आहे.
डीसीपींनी स्वत: केली चौकशी
हत्येप्रकरणी दोघांना अटक केल्यानंतर पोलिस उपायुक्त विक्रम साळी यांनी कोतवाली ठाण्यात दाखल होऊन स्वत: त्यांची चौकशी केली. यावेळी कोतवाली व गुन्हे शाखेच्या निरीक्षक नीलिमा आरज व अर्जुन ठोसरे हजर होते.
Web Title: Murder Of A Trader In Amravati
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..