
नागपूर : मेडिकल-सुपरच्या विकासासाठी २५ कोटी
नागपूर : मेडिकलमध्ये अलीकडे उपचारात दिरंगाई, औषधांचा तुटवडा, गरिबांच्या हातात औषधांच्या चिठ्ठ्या देण्यापासून, तर वरिष्ठ डॉक्टरांच्या रिकाम्या खुर्च्या दिसतात. याकडे विद्यमान प्रशासनाचे लक्ष गेले असून येथील उपचार यंत्रणा सुधारण्यासोबतच येथे अत्याधुनिक यंत्रसामग्रीतून उपचाराचा दर्जा वाढवण्यावर प्रशासनाचा जोर आहे. नुकतेच जिल्हा नियोजन समिती आणि राज्याकडून मेडिकल आणि सुपरच्या विकासासाठी २५ कोटींचा निधी मंजूर केला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालया (मेडिकल) च्या विकासाठी जिल्हा नियोजन समितीने १० कोटीचा निधी तर राज्याकडून (स्टेट प्लान) ३ कोटी असा १३ कोटीचा निधी मिळाला आहे. तर सुपर स्पेशालिटीचा दर्जा उंचावण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून १० कोटी आणि स्टेट प्लानमधून २ कोटी असा एकूण २५ कोटीचा निधी मिळाल्यामुळे मेडिकल-सुपरमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना उपचाराचा उत्तम दर्जा राखता येईल. मेडिकलमध्ये ॲनेस्थेशिया वर्क स्टेशन तयार करण्यापासून तर नेत्ररोग विभागाचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. येथील व्हिट्रेक्ट्रॉमी यंत्र मागील दीड वर्षांपासून बंद आहे. हे यंत्र सूरू करण्यासंदर्भात मेडिकल मिळालेल्या मदतीतून हे यंत्र सुधारण्यात येणार आहे. रेटिना तज्ज्ञांना काम मिळेल आणि रेटिनाच्या गरीब रुग्णांवर उपचार होतील, असा विश्वास मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी व्यक्त केला.
लॉन्ड्रीसाठी ५ तर किचनसाठी २ कोटी
मेडिकलमधील लॉन्ड्री जीर्ण झाली आहे. आताही हातानेच सर्व कपडे धुण्याचे काम चालते. यामुळे बदलता काळ बघता ५ कोटी रुपये खर्चून स्वयंचलित लॉन्ड्री प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मागील दशकापासून मेडिकलचे ‘किचन'' मॉड्युलर होणार होते. त्यासाठी ६० लाख रुपये मंजूर झाले होते. परंतु मेडिकलचे किचन ‘मॉड्युलर'' झालेच नाही. भाजी कापण्याच्या यंत्रासह ‘पोटॅटो किलर''व इतर यंत्रसामग्री पोहोचलीच नाही. यावेळी मेडिकलच्या किचनला मॉड्युलर बनवण्यासाठी २ कोटीचा निधी खर्च करण्यात येणार आहे. तब्बल पाच हजार वर्ग फूट परिसरात पसरलेले मेडिकलचे किचन येत्या वर्षभरात मॉड्युलर होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. दररोज एक हजार रुग्णांसाठी मेडिकलच्या किचनमध्ये स्वयंपाक केला जातो.
मेडिकल असो की सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. हे गरिबांचे आहे. गरिबांना येथे आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात. त्यासाठी सर्व डॉक्टर, कर्मचारी यांनी वेळेत उपस्थित राहावे. तसेच येथे उपलब्ध यंत्रसामूग्रीतून गरिबांना अत्याधुनिक उपचार मिळावे.पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मेडिकल १०आणि सुपरला १०असा २० कोटीचा निधी दिला. पालकमंत्री महोदयांचे आभार.
-डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता, मेडिकल-सुपर, नागपूर
Web Title: Nagpur 25 Crore State Of The Art Equipment For Medical Super Treatment
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..