esakal | Nagpur : पुढील निवडणुकीत ५० प्रभाग
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

Nagpur : पुढील निवडणुकीत ५० प्रभाग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्य निवडणूक आयोगाने तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार प्रभागाचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. पुढील फेब्रुवारीत अपेक्षित असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी नव्या बारा प्रभागाची भर पडणार असून एकूण ५० प्रभागातून उमेदवार उभे राहतील. महिनाभरात प्रभागाचा कच्चा आराखडा तयार होणार असल्याचे महापालिकेतील सूत्रांनी नमूद केले.

राज्य निवडणूक आयोगाने ऑगस्टमध्ये एक सदस्यीय वॉर्डाचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले होते. कच्च्या आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात असताना राज्य सरकारने तीन सदस्यीय प्रभागरचनेवर शिक्कामोर्तब केले. राज्यपालांनी यासंबंधी अधिसूचना काढली. राज्य निवडणूक आयोगाने काल, बुधवारी तीन सदस्यीय प्रभागाचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश महापालिकांना दिले. त्यानुसार महापालिकेने पुन्हा तीन सदस्यीय प्रभागाचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या कामाला आजपासून सुरवात केली.

हेही वाचा: नागपूर हादरलं! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

तीन सदस्यीय प्रभाग रचनेमुळे शहरात नव्या बारा प्रभागाची भर पडणार आहे. त्यामुळे शहरात एकूण ५० प्रभाग तयार होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या ३८ प्रभागांतून महापालिकेत १५१ सदस्य आहेत. शेवटचा ३८ क्रमांकाचा प्रभाग तीन सदस्यांचा आहे. नव्या तीन सदस्यीय प्रभागानुसार शेवटचा अर्थात ५० व्या क्रमांकाचा प्रभाग चार सदस्यांचा राहणार आहे. तीन सदस्यीय प्रभागाचा कच्चा आराखडा महिनाभरात तयार होण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तविली.

निवडणूक महिनाभर लांबणार ?

विद्यमान महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ फेब्रुवारीपर्यंत आहे. त्यामुळे ऑगस्टमध्येच प्रभागाची रचना आदी प्रक्रियेला सुरवात होणे अपेक्षित होते. परंतु, प्रभागाच्या कच्च्या आराखड्यालाच दोन महिन्यांचा विलंब होत आहे. प्रभागाच्या कच्च्या आराखड्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून सीमेबाबत हरकती, आक्षेप मागविल्या जाणार आहे. त्यानंतर प्रभागातील आरक्षण ठरतील. या सर्व प्रक्रियेमुळे निवडणूक महिनाभर लांबण्याची शक्यताही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली.

loading image
go to top