
काटोल: पुरात वाहून गेलेला युवक तारेला अडकल्याने रात्रीच्या किर्र काळोखात दोन तास झुंज देत राहिला. लिंगा गावातील सरपंच व सहकाऱ्यांना त्याचे प्राण वाचविण्यात यश आले. अंगावर शहारे आणणारी घटना काटोलपासून चार किलोमीटर अंतरावरील नागपूर मार्गावरील लिंगा पारडी जोडणाऱ्या पुलावर घडली.
बुधवारच्या रात्री पारडी (गोतमारे) येथील युवक राजेंद्र केशव शेंडे हा लिंगा शिवारातील शेतातून काम आटोपून घरी परत येत असताना पाऊस सुरू झाला. गावाला जाताना नदी पार करावी लागते. काही वेळ वाट बघून रस्त्याने जाताना खूप जास्त पूर नसावा, असे समजून ते जायला निघाले. काही अंतर पार करताच पाण्याचा मोठ्ठा लोंढा त्यांच्या दिशेने आला. काही कळण्याच्या आत त्यांना वाहत घेऊन गेला.
सुदैवाने राजेंद्र यांच्या हाताला लिंगा ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठ्याच्या विहिरीवरील विद्युत वाहिनीच्या खांबाचा ताण देणारा तार लागला. ताकदीने त्यांनी तो तार पकडून जिवाच्या आकांताने ओरडायला सुरुवात केली. आवाज ऐकून ग्रा.पं.सदस्य मुकेश पाटील मागोवा घेतला. तेव्हा त्यांना कुणीतरी पुरात अडकल्याचे वाटले. कुणीतरी धोक्यात असल्याची खात्री होताच सरपंच विनोद ठाकरे यांना तातडीने फोन लावला. सरपंचदेखील त्वरित बाहेर पडले. काटोलचे तहसीलदार अजय चरडे तसेच पोलिस निरीक्षक महादेव आचरेकर यांना संपर्क साधला व हकीकत सांगितली.
त्याच वेळी काटोल येथील लेंडी नदीला पूर असल्याने प्रशासकीय यंत्रणा नदीच्या शेजारील वस्तीत पाणी शिरल्याने तेथे व्यस्त होती. आम्ही प्रयत्न करतो, लगेच पोहचतो असे सांगितले. सरपंच यांनी वेळ न घालविता सहकाऱ्यांचे मदतीने घटनेची गंभीरता बघून रेस्क्यू करण्याचे ठरविले. टॉर्च व घरुन व शेजाऱ्यांकडून दोर गोळा केले. मानवी साखळी करून राजेंद्रपर्यंत पोहचण्यात ते यशस्वी झाले. त्यांना सुखरूप बाहेर सुद्धा काढले.
तब्बल दोन तास पुराच्या पाण्याशी राजेंद्र यांनी झुंज दिली. रात्री राजेंद्र जीवघेण्या संकटात अडकला होता. त्यावेळी त्याचे आवाजाची मुकेश पाटील यांनी घेतलेली दखल व सरपंच विनोद ठाकरे यांनी त्वरित घेतलेला निर्णय व प्रीतसद राजेंद्र यांचे प्राण वाचविण्यात देवदूत ठरला आहे.
आज या ठिकाणी घडलेल्या घटनेत तुम्ही निश्चितच ‘देवदूत’ ठरलात. तुमच्यासारख्या युवकांच्या हाती गावाची धुरा असल्याचे पाहून समाधान वाटते. राजेंद्रसाठी काळ आला होता, मात्र सरपंच आणि त्यांच्या साथीदारांनी त्याला हुसकावून लावले. - अजय चरडे, तहसीलदार, काटोल
आज माझ्या लहान भावाला विनोदभाऊच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या रूपाने खऱ्या देवाचे दर्शन झाले. असेच सहकारी प्रत्येक गावाच्या पाठीशी राहिले तर गावाचे नंदनवन होऊ शकते. माझ्या भावाचे आजपासूनचे आयुष्य हे यांचे कर्ज आहे. हे आम्ही मरेपर्यंत लक्षात ठेवू आणि भविष्यात लिंगावासीयांच्या मदतीसाठी तत्पर राहू.- विश्वासराव केशव शेंडे, उपसरपंच, पारडी (गोतमारे)
राजेंद्रने दाखवलेली हिम्मत, आणि पुराच्या पाण्याशी केलेला संघर्ष शब्दात बांधणे कठीण आहे. सरपंच ग्रा.पं. लिंगा सावळी आणि त्यांचे सहकारी खरे देवदूत ठरले. यांच्या हिमतीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.-निलिमा अनिल ठाकरे, सदस्या, पंचायत समिती, काटोल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.