Nagpur Accident : दोन सख्ख्या भावांसह पाच युवकांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

Nagpur Accident : दोन सख्ख्या भावांसह पाच युवकांचा मृत्यू

नागपूर/ हिंगणा : मंगळवार पाच युवकांसाठी घातवार ठरला. जिल्‍ह्यात अपघातांच्या तीन घटना घडल्या असून यामध्ये दोन सख्ख्या भावांसह पाच युवकांवर काळाने झडप घातली. मृतांमध्ये मो. मुस्तफाचे वय अवघे १८ होते. इतर चार तरुणही पंचविशीच्या आतील होते. पहिला अपघात वानाडोंगरीजवळ, दुसरा रामेटक तर तिसरा सावनेर तालुक्यात झाला.

मंगळवारी झालेल्या अपघातात ठार झालेल्या युवकांमध्ये मो.आफताब मो. इस्लाम (वय२१), मो.मुस्तफा इस्लाम (वय१८, दोघेही रा. बिहार) या सख्ख्या भावांसह लोकेश धनराज घरत (वय२३), आदित्य सत्यपाल कनोजिया (वय२१, दोघेही रा.सावनेर),विजय बागडे (वय२५, महादुला) या पाच जणांचा समावेश आहे.

मो.आफताब, मो. मुस्तफा हे दोघेही भाऊ वानाडोंगरी येथे राहायचे. ते वानाडोंगरी येथील कान्हा ऑटोमोबाईलमध्ये मोटरसायकल दुरुस्तीचे काम करायचे. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घरून दुचाकीने (एमएच४०, डी ६९१०)निघाले. वाटेत हिंगणा मार्गावर कल्पिक बार समोरच्या डिव्हायडर लगत वळण घेत असतानाच हिंगण्याकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या टिप्परने

दोन सख्ख्या भावांसह पाच युवकांचा मृत्यू

(एमएच३४, एम ८८११)दुचाकीला जबर धडक दिली. यात दोघेही भाऊ टिप्परच्या चाकात सापडले. अंगावरून टिप्पर गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

लोकेश धनराज धरत (२३) व आदित्य सत्यपाल कनोजिया (२१, दोघेही रा. सावनेर) हे एमएच-४०/केजे-८०४५ क्रमांकाच्या दुचाकीने सावनेरहून खाप्याला येत होते. कोदेगाव परिसरात त्यांनी समोर असलेल्या एमएच ४०, एके-८५५१ क्रमांकाच्या टिप्परला ओव्हरटेक केले. त्यातच टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने ते चाकाखाली आले. यात एकाचा घटनास्थळीच तर दुसऱ्याचा उपचाराला नेताना वाटेत मृत्यू झाला. या दोन्ही प्रकरणात एमआयडीसी व खापा पोलिसांनी टिप्पर चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

तिसरी घटना रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. महादुला येथील दोन तरुण दुचाकीने (एमएच४०,सीएल ६४४१) गावाकडे परत येत असताना तुमसरकडून भरधाव येणाऱ्या निळ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने(एमएच४९,एई २४६३) शिरपूर शिवारातील हॉटेल राजमहल रिसॉर्टसमोर जोरदार धडक दिली. त्यात विजय रमेश बागडे(वय२५)व अक्षय हिरामण सिंदराम यांना जबर मार लागला. त्यात विजय बागडे याचा उपचारादरम्यान मेडिकल कॉलेज नागपूर येथे मृत्यू झाला. जखमी अक्षयवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास रामटेक पोलिस करीत आहेत.

दोन्ही दुचाकीचालक हेल्मेटविना

या अपघातातील दोन्ही दुचाकी चालकांचा मृत्यू झाला. त्या दोघांनीही दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर केला नव्हता, अशी माहिती एमआयडीसीचे ठाणेदार ठाणेदार भीमा नरके व खाप्याचे ठाणेदार अजय मानकर यांनी दिली. खापा-कोदेगाव रोडच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने रोडच्या अर्ध्या भागाने वाहतूक सुरू आहे. त्यातच दुचाकी चालकाने टिप्परला ‘ओव्हरटेक’ करण्याचा प्रयत्न केला आणि तो जिवावर बेतला.