Organ Donation : सुखदेव यांच्या अवयवदानातून तिघांना जीवनदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Organ Donation

Organ Donation : सुखदेव यांच्या अवयवदानातून तिघांना जीवनदान

नागपूर : पत्नी, दोन मुलांचा आधार असलेले चाळिशीतील सुखदेव धोंडू खंगार यांचा अपघात झाला. दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांना मेंदूमृत घोषित करण्यात आले. घरातील कर्ता पुरुष गेल्याचे डोंगराएवढे दुःख बाजूला ठेवत कुटुंबाने अवयवदानाचा निर्णय घेत समाजासमोर एक आदर्श घालून दिला. सुखदेवराव यांच्या अयवदानातून एका मातेच्या नऊ वर्षाच्या काळजाच्या तुकड्यासह तिघांना जीवनदान मिळाले.

भंडारा जिल्ह्यातील कटी, हरदोली गावातील सुखदेवराव भावासोबत दुचाकीवरून भावासह बाजारात जात असताना पिंपळगावाजवळ ३० नोव्हेंबरला अपघात झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ एम्समध्ये दाखल करण्यात आले.

उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. अवयवदानाची तयारी नातेवाइकांनी दर्शविल्याने विभागीय अवयवदान समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी तसेच सचिव डॉ. संजय कोलते यांनी अवयवदानासाठी पुढाकार घेतला. न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये युवक यकृताच्या प्रतिक्षेत होता. तत्काळ न्यू ईरातील यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ.राहुल सक्सेना यांच्यासह डॉ. साहिल बंसल, डॉ. स्नेहा खाडे या डॉक्टरांच्या पथकाने यकृत प्रत्यारोपण करीत ५१ वर्षीय व्यक्तीला जीवनदान दिले.

वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. समीर चौबे, डॉ. संजय कोलते यांच्या वैद्यकीय पथकाने ४७ वर्षीय युवकाला नवे जीवन दिले. तर किंग्ज वे हॉस्पिटलमध्ये डॉ. प्रकाश खेतान, डॉ. वासुदेव रिधोरकर, डॉ.धनंजय बोकारे यांच्या पथकाने अवघ्या नऊ वर्षीय चिमुकल्याच्या शरीरात किडनी प्रत्यारोपित त्याला जीवनदान दिले. नऊ वर्षाच्या चिमुकल्याच्या आईने दोन्ही हात जोडून डॉक्टरांचे आभार मानले. तर अवयव दान करणाऱ्या युवकाच्या कुटुंबीयांच्या ऋणात आयुष्यभर राहू अशी प्रतिक्रिया नोंदवली.

एम्समधील पहिला मेंदूमृत

एम्समध्ये रुग्णाला दाखल केल्यानंतर उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याचे पुढे आले. यामुळे डॉक्टरांनी मेंदूपेशी तपासल्या. मेंदूपेशी मृत्यू झाल्याचे निदान करण्यासाठी डॉ. नीलेश अग्रवाल, डॉ.पराग मून, डॉ. अमोल कोकस, डॉ.साहिल बंसल यांनी मेंदूमृत घोषित केले. एम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार आणि डॉ.अश्विनी चौधरी यांनी नातेवाईकांचे अवयवदानासंदर्भात समुपदेशन केले.