कार्यकर्ता चतुर हवा, अतिशहाणा नको; केंद्रीयमंत्री गडकरी | Nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नितीन गडकरी

नागपूर : कार्यकर्ता चतुर हवा, अतिशहाणा नको; केंद्रीयमंत्री गडकरी

नागपूर : निष्ठावंत कार्यकर्त्यामुळे पक्षाचा विस्तार झाला. पक्षात अनेकदा पदे मिळतात किंवा वर्षानुवर्षे मिळतही नाही. संयमाने जो काम करतो तोच खरा कार्यकर्ता असतो. तीच पक्षाची खरी ताकद असते. परंतु, कार्यकर्ता चतुर हवा, अतिशहाणा नको, असे वक्तव्य केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात समर्पण सेवा समितीच्यावतीने आयोजित दीपावली मिलन कार्यक्रमात गडकरी बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य गिरीश व्यास यांच्या सहा वर्षात केलेल्या विकासकामांच्या पुस्तकरूपी अहवालाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. व्यासपीठावर माजी खासदार दत्ता मेघे, अजय संचेती, माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर दयाशंकर तिवारी, शहर अध्यक्ष प्रवीण दटके, अनिल सोले आदी उपस्थित होते.

हेही वाचा: मंदाणे : पंधरा एकर ऊस जळाला; आठ लाखांचे नुकसान

यावेळी केंद्रीयमंत्री गडकरी यांनी पक्षाची कामे करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. गडकरी म्हणाले, एकेकाळी नागपुरात भाजपची ताकद नव्हती. एक आमदार सुद्धा नव्हता, मात्र खूप प्रयत्न केले. आज भाजपला चांगले दिवस आले आहेत. भाजपमध्ये रामभाऊ म्हाळगी यांनी विकासकामांचा अहवाल देण्याची परंपरा सुरू केली.

लोकप्रतिनिधी म्हणून केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी पुस्तक एक माध्यम आहे. कामाचा अहवाल देण्याची पद्धत आहे. गिरीश व्यास आणि मी जुन्या कार्यकर्त्यांपैकी आहेत. जुने झाले की मोडीत निघते, अस म्हणतात. मात्र, भाजपमध्ये असे होत नाही. आणीबाणीच्या काळात गिरीश व्यास आणि मी काम केले. नंतर युवा मोर्चाचे काम सुरू झाले. संयमाने वागून काम करतो तो खरा कार्यकर्ता आणि तीच खरी पक्षाची ताकद असते असेही गडकरी यावेळी म्हणाले. यावेळी बावनकुळे यांचेही भाषण झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आभासी पद्धतीने संवाद साधला. कार्यक्रमाचे संचालन संजय बंगाले यांनी केले.

loading image
go to top