उपराजधानीची हवा धोकादायक स्तरावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Air Pollution

ग्रीन सिटी म्हणून ओळख असलेले नागपूर शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. येथील वातावरणात सल्फर डायऑक्साईड व नायट्रोजन डायॉक्साईडचा स्तर प्रचंड वाढला आहे.

Nagpur Air Pollution : उपराजधानीची हवा धोकादायक स्तरावर

नागपूर - ग्रीन सिटी म्हणून ओळख असलेले नागपूर शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. येथील वातावरणात सल्फर डायऑक्साईड व नायट्रोजन डायॉक्साईडचा स्तर प्रचंड वाढला आहे. जानेवारी ते पाच मार्चपर्यंत ६४ पैकी ६० दिवस हवा प्रदूषित असल्याचे निदर्शनात आले आहे. यामुळे आजाराचे प्रमाणही वाढू लागल्याचे चित्र आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जानेवारी, फेब्रुवारी महिना आणि पाच मार्चपर्यंतची आकडेवारी जाहीर केली आहे. २०२३ च्या सव्वा दोन महिन्यांचे जवळपास सर्व दिवस येथील हवा प्रदूषित होती. यातले केवळ चारच दिवस शुद्ध हवेचा स्तर समाधानकारक होता. ही बाब आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे मत पर्यावरण अभ्यासक व्यक्त करत आहेत.

सर्वसाधारणपणे हिवाळ्यातील थंडीचा काळ आरोग्यदायी म्हणून गणला जातो. मात्र नागपुरात हिवाळ्याच्या तिन्ही महिन्यांत प्रदूषणाचा निर्देशांक वाढलेला दिसून आला आणि शुद्ध हवेचे दिवस घटत चालल्याचे दिसले आहे.

नोव्हेंबरमध्ये ३० पैकी २८ दिवस प्रदूषणात गेले आणि डिसेंबरचे ३१ पैकी ३० दिवस हवेची गुणवत्ता खराब असल्याचे दिसून आले आहे. आता २०२३ च्या जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंतच्या ६४ दिवसांपैकी पैकी ६० दिवस हवा खराब असल्याचे दिसून आले आहे.

ही आकडेवारी सिव्हिल लाइन्स येथील सीपीसीबीच्या आकडेवारीनुसार २०२३ च्या दोन महिने पाच दिवसात ४७ दिवस शहर साधारण प्रदूषणाच्या गटात म्हणजेच वायू गुणवत्ता निर्देशांक

उपराजधानीची हवा धोकादायक स्तरावर

१०१ ते २०० एक्यूआयच्या गटात होता. केवळ चारच दिवस हवेची गुणवत्ता समाधानकारक होती. म्हणजे ५० ते १०० एक्यूआय होता. दहा दिवस हा स्तर २०० ते ३०० एक्यूआयच्या म्हणजेच धोक्याच्या श्रेणीत होते. परसोडी येथील व्हीएनआयटीमध्ये लावण्यात आलेल्या प्रदूषण निर्देशकांच्या फलकावर आजचा एक्यूआय ३४१ दाखविण्यात येत आहे. यामुळे शहरातील हवा दिवसेंदिवस अधिकच प्रदूषित होत असल्याचे दिसून येत आहे.

वाढता प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार, त्वचारोग, डोळ्यांची जळजळ, ॲलर्जी यांसारखे आजारसह हृदयरोग सारखे गंभीर रोग उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमा अंतर्गत नागपूरसाठी कृती आराखडा तयार होणे गरजेचे आहे.

- प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी.

टॅग्स :Nagpurair pollution