
नागपूर : एवढे राष्ट्रध्वज कसे उपलब्ध करणार?
नागपूर - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून केंद्र सरकारने १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर झेंडा’ ही मोहीम राबविण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रध्वजाची मागणी खादी ग्रामोद्योगाच्या केंद्रांकडे १० पटीने वाढलेली आहे. तथापि, एवढ्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वजांची उपलब्धी कशी होणार, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.
नागपूर जिल्ह्यात दहा लाख घरे असून प्रत्येक ‘हर घर झेंडा‘ ही मोहीम राबविण्याचा निर्धार आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. राज्य व केंद्र सरकार तयारीला लागले असून शाळा, महाविद्यालय, खासगी प्रतिष्ठाने, कार्पोरेट कंपन्यांना या मोहिमेत सहभागी होण्याची विनंती केली आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालय काही खासगी संस्था, कार्पोरेट संस्थांकडून खादी ग्रामोद्योग आयोगाच्या दुकानांमध्ये राष्ट्रध्वजासाठी विचारणा करीत आहेत. शहरात खादी ग्रामोद्योगाची चार दुकाने असून सर्वच ठिकाणी मागणीसाठी दूरध्वनी खणखणत आहे. ही मोहीम राबविण्याची घोषणा अजून दोन ते तीन महिन्यापूर्वी करायला हवी होती.
पाऊण महिन्यापूर्वी हर घर झेंडा ही मोहीम केंद्र सरकारने जाहीर केली. १५ ऑगस्ट तोंडावर आलेला आहे. दरवर्षी शहरात १५ ते २० हजार राष्ट्रध्वजांची विक्री होते. त्यानुसार शहरातील विक्रेत्यांनी राष्ट्रध्वजाची मागणी केली. दरवर्षी शहरात २० लाखाची उलाढाल राष्ट्रध्वज विक्रीतून होत असते. यंदा खासगी व्यक्तींना झेंडे तयार करण्याची परवानगी दिलेली आहे. त्यामुळे अंदाजे दोन ते अडीच कोटीची उलाढाल शहरात होण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
केंद्र सरकारने हर घर झेंडा या मोहिमेची घोषणा वेळेवर केली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना तयारी करण्यासाठी वेळच मिळालेला नाही. आता मागणी नोंदवली जात असली तरी राष्ट्रध्वज आलेले नाहीत. पूर्वी मागणी करताच ध्वज उपलब्ध होत असे,असेही काही विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
देशभरात झेंड्याची गरज : २५ कोटी
उपलब्ध : चार कोटी
शहरातील मागणी : ८ लाख झेंडे
उपलब्ध साठा : २० हजार
खादी ग्रामोद्योगमधील दर
राष्ट्रध्वजाचे आकार व किंमत
दीड बाय दोन (घरी लावण्यासाठी) : ३५० रुपये
कार्यालयासाठी
दोन बाय तीन : ७६० रुपये
तीन बाय साडे चार : १५५० रुपये
चार बाय सहा : १९९० रुपये
सहा बाय नऊ : ५५०० रुपये
राष्ट्रध्वज तयार होणारी ठिकाणे
नांदेड, मुंबई, ग्वालीयर, हुबळी
एक झेंडा तयार करण्यासाठी तीन ते चार तास लागतात. एवढ्या कमी दिवसात मागणीनुसार तिरंगी झेंडे तयार करणे अशक्य आहे. ही मोहीम सहा महिन्यापूर्वी जाहीर झाली असती तर खादी ग्रामोद्योगाला ‘अच्छे दिन’ आले असते. घरांवर लावण्यासाठी दीड बाय दोन आकारातील झेंडा लावण्याची परवानगी दिलेली आहे.
- बबन पडोलीया, व्यवस्थापक, नाग विदर्भ चरखा संघ सीताबर्डी.
हर घर झेंडा या मोहिमेची पूर्व कल्पना असती तरी देशभरातील खादी ग्रामोद्योगामध्ये झेंड्याची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली असती. त्यामुळे झेंड्याची उपलब्धताही असती. आता मागणी वाढली असताना आम्हाला राष्ट्रध्वज उपलब्ध करून देता येईल की नाही याबद्दल शंका आहे. देशात चार ते पाचच ठिकाणी झेंडे तयार केले जातात.
- सुरेश रेवतकर, व्यवस्थापक, खादी ग्रामोद्योग भवन, गांधी सागर
Web Title: Nagpur Amrit Festival Of Independence National Flags Central Govt Announcement Har Ghar Zenda Campaign
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..