Nagpur : ॲथलिट वर्षा कानपुरेची सुविधा व परिस्थितीवर मात करत गरुडझेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्षा कानपुरे

Nagpur : ॲथलिट वर्षा कानपुरेची सुविधा व परिस्थितीवर मात करत गरुडझेप

नागपूर : ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंमध्ये गुणवत्ता असते, परंतु आर्थिक परिस्थिती किंवा अनुकूल वातावरणाअभावी ते अपेक्षित उंची गाठू शकत नाही. पुसद तालुक्यातील (जि. यवतमाळ) राजना भंडारी या छोट्याशा गावातील राष्ट्रीय महिला ॲथलिट वर्षा कानपुरे ही अशाच युवा खेळाडूंपैकी एक. हलाखीच्या परिस्थितीवर मात करत वर्षाने राष्ट्रीय स्तरावर झेप घेतलीय. मात्र दिवसरात्र मेहनत घेऊनही तिला अद्याप पाहिजे तशी प्रगती साधता आली नाही. समाजाचे पाठबळ मिळाल्यास नक्कीच स्वप्न पूर्ण करू शकतो, असे तिचे म्हणणे आहे.

२४ वर्षीय वर्षा ही हतोडाफेकीची खेळाडू आहे. या क्रीडा प्रकारासाठी छोट्या शहरांमध्ये फारशा पायाभूत सोयीसुविधा राहात नसल्यामुळे बहुतांश खेळाडू हतोडाफेकीपासून दोन हात दूर राहतात. मात्र जिद्दी वर्षाने प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा निर्णय घेत आपले उज्ज्वल करिअर केले. बंगळूर, राजस्थानपासून नेपाळपर्यंतच्या स्पर्धांसह स्पर्धांमध्ये तिने पदके जिंकली. वर्षाच्या गावात आणि यवतमाळमध्येही हतोडाफेकीची सुविधा नाही. त्यामुळे प्रगतीसाठी नाईलाजाने तिला गाव सोडून नाशिकला जावे लागले. चार हजार रुपये किरायाची रूम घेऊन ती नीट परीक्षेची तयारी करीत असलेल्या धाकट्या बहिणी (आंचल) सोबत स्वप्नांचा पाठलाग करीत आहे.

वर्षाची आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची आहे. वडिलांचे (हरी कानपुरे) १७ वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर आईने (चंदा) पाचही मुलींना लहानाचे मोठे केले. अडीच एकर वडिलोपार्जित कोरडवाहू शेती आणि छोटेसे किराणा दुकान चालवून कानपुरे परिवाराचा कसाबसा गाडा सुरू आहे. त्यामुळे मुलींचे शिक्षण, तिघींचे लग्न व वर्षाचा खर्च (डायट, स्पोर्ट्स किट इत्यादी) करताना परिवाराची चांगलीच घायतोड होत आहे. आईची तगमग बघून वर्षाही खेळासोबतच पार्टटाइम जॉब मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या बीपीएड करीत असलेली वर्षा बीपीईमध्ये ९३ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली. एखाद्या खासगी शाळेत जॉब मिळाल्यास आईला व बहिणीचे डॉक्टर होण्याला मोठा हातभार लागेल, असे तिला वाटते. शिवाय स्पोर्ट्स कोट्यातूनही जॉबसाठी ती प्रयत्न करीत आहे.

समाजाकडून मदतीची अपेक्षा

रुमचे भाडे, आहार आणि इतर गोष्टींवर होणारा एकूण खर्च वर्षाच्या आवाक्याबाहेर आहे. पुरेसा आहार मिळत नसल्यामुळे प्रॅक्टिस करूनही अपेक्षित यश मिळत नसल्याची व्यथा तिने बोलून दाखविली. वर्षा सध्या ५५ मीटरच्या आसपास हतोडाफेक करते. यात सुधारणा करण्यासाठी तिला ‘हेल्दी डायट’ व सप्लिमेंट्सची आवश्यकता आहे.

टॅग्स :NagpursportsSakalathlete