Nagpur : अट्टल गुन्हेगार बनणार फुटबॉलचे ब्रँड ॲम्बॅसॅडर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुटबॉल

Nagpur News: अट्टल गुन्हेगार बनणार फुटबॉलचे ब्रँड ॲम्बॅसॅडर

नागपूर : अजाणत्या वयात हातून नकळत चुकून एखादा गुन्हा घडल्यानंतर त्या मुलावर गुन्हेगार म्हणून शिक्का मारला जातो. समाजाकडून त्याच्या परतीच्या वाटा बंद केल्या जातात. अशा अल्पवयीन मुलांना फुटबॉलचे धडे देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचे महान कार्य लोणारा (गोधनी) येथील क्रीडा विकास संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या ठिकाणी फुटबॉलचे बेसिक ट्रेनिंग घेतल्यानंतर ही मुले लवकरच फुटबॉलचे ब्रँड ॲम्बॅसॅडर बनून भविष्यात युवा खेळाडू घडविणार आहेत.

यासंदर्भात माहिती देताना क्रीडा विकास संस्थेचे प्रमुख प्रा. विजय बारसे म्हणाले, विविध गुन्ह्याखाली शिक्षा भोगून अलीकडे जामिनावर सुटलेल्या पुण्याच्या बालसुधारगृहातील १८ वर्षांखालील नऊ मुलांना न्यायालयाला विनंती केल्यानंतर संदेश बोंडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही नागपुरात आणले होते. संस्थेत त्यांना आठवडाभर फुटबॉलचे बेसिक प्रशिक्षण देण्यात आले.

शेवटच्या दिवशी डीसीपी बागुल व क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या मॅचेस आयोजित करण्यात आल्या होत्या. फुटबॉलचे कौशल्य प्राप्त केल्यानंतर या सर्वांना रविवारी येरवडा सुधारगृहात रवाना करण्यात आले. ही मुले भविष्यात ठिकठिकाणी लहान मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण देऊन युवा पिढी घडविणार आहेत.

याशिवाय त्यांना फुटबॉलचे ब्रँड ॲम्बॅसॅडरदेखील बनविले जाणार आहे. यातील काही मुलांना पालकत्व घेण्यात येणार असून, राज्यातील इतरही बालसुधारगृहातील मुलांसोबत त्यांचा संवाद घडवून आणला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे, बारामती, मुंबई, हैदराबाद, ओडिशा इत्यादी ठिकाणच्या या अल्पवयीन गुन्हेगारांमध्ये पाच जणांवर खुनाचा, तिघांवर चोरीचा तर एकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

अट्टल गुन्हेगार बनणार फुटबॉलचे ब्रँड ॲम्बॅसॅडर

या मुलांना स्वतः आयटी अभियंता असलेले संदेश बोंडे यांनी फुटबॉलचे प्रशिक्षण दिले. गुन्हेगारी जगतातील मुलांवर फुटबॉलचे संस्कार करून त्यांना समाजातील मुख्य आणण्याचा भारतातील हा पहिलाच प्रयोग करण्यात असल्याची माहिती, प्रा. बारसे यांनी यावेळी दिली.

बदलाचा हा प्रयोग भविष्यात ही सुरूच राहणार असल्याचे प्रा. बारसे म्हणाले. प्रा. बारसे यांनी यापूर्वीही स्लम सॉकरच्या माध्यमातून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अनेक मुलांवर फुटबॉलचे प्रशिक्षण देऊन त्यांना नवीन आयुष्य प्रदान केले आहे. त्यांचे हे महान कार्य बिग बी अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या झुंड चित्रपटाद्वारे संपूर्ण जगापुढे आलेले आहे.