Nagpur : सांगा, राजेहो! आम्ही जायचे कुठून? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur

Nagpur : सांगा, राजेहो! आम्ही जायचे कुठून?

सावनेर : तालुक्यातील शिंदेवानी (खुर्द) या गावाला जोडणारा पूल (रपटा) पावसाळ्यामध्ये आलेल्या पुराने वाहून गेला. परंतु अद्याप वाहून गेलेला पूल दुरुस्त न केल्यामुळे संबंधित गावकऱ्यांचा दळणवळणाचा संपर्क तुटला असून मोठ्या संकटाचा सामना गावातील शेतकरी व विद्यार्थ्यांना आणि रहदारी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला करावा लागत आहे. हा पूल क्षतिग्रस्त नादुरुस्त असून कोणीही या पुलावरून जाऊ, अथवा रहदारी करू नये अशा सूचनेचा फलक त्या ठिकाणी लावलेला आहे. मग गावकऱ्यांनी जायचे तरी कोठून? हा प्रश्न गावकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

या संदर्भात गावातील सरपंचाला तसेच पं.स.सदस्य आणि जि.प.सदस्यांना वेळोवेळी विनंती करूनही संबंधित पुलाची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने गावकऱ्यांनी स्थानिक सरपंच आणि लोकप्रतिनिधींविषयी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला आहे. गावातील तरुणांनी या पुलाच्या दुरुस्तीबाबत नुकतेच सहायक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावनेर येथे आणि तहसीलदारांना एक निवेदन देऊन पुलाची दुरुस्ती करण्याबाबत मागणी केली. पूल नादुरुस्त असल्याने गावातील शेतकऱ्यांना कापूस विक्रीकरिता नेण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

गावाला दुसरा कोणताही रस्ता नसून या रस्त्याने पुलावरून कोणतेही चारचाकी वाहन तर दूर साधी बैलगाडीसुद्धा सद्यस्थितीत जात नसल्याने गावकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. तरी या संदर्भात प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी तत्काळ लक्ष देऊन पुलाची दुरुस्ती करण्यात यावी, असे निवेदन गावातील नितीन शेंडे, उमेश बोबडे, सुखदेव कोहळे, अमित शेंडे, दीपक गुरारीकर, बंडू कामोने, अंकुश डोंगरे, भास्कर बोबडे, श्री किशन गुरारीकर, रामाजी शेंडे, रमेश बुरसे, सचिन गुरारीकर, आकाश ठाकरे, पंकज जोगी, रामेश्वर जोगी यांच्यासह गावातील नागरिकांनी दिले आहे.