esakal | Nagpur: शहरातील अनेक बारमध्ये पुन्हा ‘छमछम’
sakal

बोलून बातमी शोधा

शहरातील अनेक बारमध्ये पुन्हा ‘छमछम’

नागपूर : शहरातील अनेक बारमध्ये पुन्हा ‘छमछम’

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : शहरातील अनेक बियरबारमध्ये बारबालांची ‘छमछम’ पुन्हा सुरू झाली असून आंबटशौकीन आणि पांढरपेशे मद्यपी मध्यरात्रीनंतर बारबालांवर लाखोंची उधळण करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहराच्या सीमेलगतच्या नव्हे तर चक्क शहरातील मध्यभागात असलेल्या बारमध्ये अगदी तोकड्या कपड्यांत बारबाला नाचविल्या जात आहेत.

विश्‍वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच शहरातील अनेक अवैध धंदे बंद करण्यात आले होते. वरली-मटका, जुगार, क्रिकेट सट्टा, अवैध दारू विक्री आणि अंमली पदार्थांची तस्करी बंद होऊन शहरातील गुन्हेगारीसुद्धा नियंत्रणात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ठाणेदार आणि काही गुन्हे शाखेच्या युनिटने ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष केल्यामुळे अनेक अवैध धंदे सुरू झाले आहेत. ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांच्या ‘दरमहा’ भेटी ठरलेल्या आहेत.

हेही वाचा: मुलानं सेक्स करावा, ड्रग्जही घ्यावं; शाहरुखने 24 वर्षांपूर्वी केलेलं वक्तव्य

एवढेच नव्हे तर शहरातील मध्यभागी बारमध्ये बारबालांचे अश्‍लील नृत्य सुरू झाले आहे. काही डान्सबारमध्ये बारबालांवर आंबटशौकीन आणि व्हाइट कॉलर मद्यपी पैशांची उधळण करीत आहेत. अनेक बारमालकांनी पोलिस स्टेशनमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मॅनेज करीत गुन्हे शाखेच्याही युनिटमधील कर्मचाऱ्यांना ‘खूश’ केल्याची चर्चा आहे.

बारमध्ये रात्री अकरा वाजतानंतर बारबालांचा अश्‍लील डान्स सुरू होतो. त्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येते. सुरवातीला चित्रपटांची गाणे म्हणणाऱ्या तरुणी थेट भडक मेकअप करून ताल धरायला लागतात. तर दुसरीकडे मद्याचे ग्लास रिचवत बसलेल्या ग्राहकांना उत्तेजित करणारे इशारे बारबाला करतात. त्यानंतर अश्‍लील नृत्य सुरू होते. रात्री उशिरापर्यंत बारबालांचा डान्स सुरू असतो.

हेही वाचा: महाराष्ट्राने सायबर सुरक्षिततेतही दिशा द्यावी - ब्रिजेश सिंग

साऊंडप्रूफ फ्लोअर आणि पंटर

शहरातील काही बारमध्ये छुप्या पद्धतीने डान्सबार सुरू आहेत. बारबालांसाठी विशेष खोलीची व्यवस्था केलेली असते. डान्स फ्लोअर साऊंड प्रूफ असतो. त्यामुळे बाहेर रस्त्यापर्यंत आवाज जात नाही. अनेक बारबाला या सेक्स रॅकेट किंवा ब्युटी पार्लरमध्ये काम केलेल्या असतात. काही बारमध्ये याच बारबालांकडून देहव्यापार करवून घेतल्या जात असल्याची चर्चा आहे.

ठाणेदाराची केली कानउघडणी

शहरातील मध्य भागात सुरू असलेल्या दोन बारमध्ये बारबालाची ‘छमछम’ सुरू होती. दोन्ही वृद्ध बारमालकांनी ठाणेदाराला ‘सेट’ केले होते. महिन्याची भेट ठरल्यानंतर दोन्ही बारमध्ये बिनधास्त तरुणींचा नृत्य सुरू होता. ही माहिती साहेबांपर्यंत पोहचली. साहेबांनी त्या दोन्ही बारमालकांसह ठाणेदाराला कॅबिनमध्ये बोलावले. साहेबांनी चांगली कानउघडणी केल्यानंतर घामाघूम झालेल्या ठाणेदाराने पुन्हा चूक होणार नाही, असे म्हणत काढता पाय घेतल्याची खमंग चर्चा आहे.

loading image
go to top