Bharat Jodo Yatra : ‘भारत जोडो यात्रा’ आज विदर्भात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Jodo Yatra

Bharat Jodo Yatra : ‘भारत जोडो यात्रा’ आज विदर्भात

नागपूर : काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा मराठवाड्यातून उद्या मंगळवारी (ता. १५ नोव्हेंबर) सकाळी ६.३० वाजता विदर्भात दाखल होत आहे. पैनगंगा नदी ओलांडून ही यात्रा वाशीम जिल्ह्यात प्रवेश करेल. यावेळी वैनगंगा नदीच्या पुलावर वाशीम जिल्हा काँग्रेस कमिटीकडून या यात्रेचे, तसेच राहुल गांधी यांचे जंगी स्वागत करण्यात येईल.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी ‘भारत जोडो’ यात्रा सुरू केली आहे. मराठवाड्यातील यात्रेच्या प्रवासानंतर ही यात्रा वाशीम जिल्ह्यात प्रवेश करेल. यात्रा राजगावमार्गे वाशीम शहरात दाखल होईल. वाशीम शहरात पोलिस ठाणे चौकात दुपारी तीन वाजता राहुल गांधी यांची कॉर्नर सभा होणार आहे. त्यानंतर अकोला नाका येथील सरनाईक महाविद्यालयात यात्रेचा मुक्काम असेल.

‘भारत जोडो’ आज विदर्भात

बुधवारी (ता. १६) सकाळी ही यात्रा मालेगाव व तेथून मेडशी येथे जाईल. मेडशीतही कॉर्नर सभा होईल. त्यानंतर यात्रा अकोला जिल्ह्यात प्रवेश करून रात्रीचा मुक्काम पातूर येथे असेल. राहुल गांधी यांच्या पदयात्रेच्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हिंगोली अकोला महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आली असून, मुक्कामाच्या ठिकाणी झेड प्लस सुरक्षा आहे.

शेतकरी विधवांचाही सहभाग

या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याच्या बोथबोडनसह किन्ही, मनपूर, इचोरी, वाटखेड या गावांतील शेतकरी विधवा महिला निघाल्या असून, राहुल गांधी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. बुधवारी (ता. १६) ५० हून अधिक महिला भारत जोडो पदयात्रेत चालणार आहेत.

२००८ मध्ये राहुल गांधी यांनी बोथबोडन येथे जाऊन शेतकरी

आणि शेतकरी विधवांसोबत संवाद साधला होता. त्यानंतर आता पुन्हा

राहुल गांधी भारत जोडो पदयात्रेच्या निमित्ताने शेतकरी विधवा महिलांचे दुःख जाणून घेतील.