Nagpur : टोळीकडून मुले पळविण्याची अफवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur children kidnapping gang rumor social media

Nagpur : टोळीकडून मुले पळविण्याची अफवा

नागपूर ; राज्यात मुले चोरणारी टोळी सक्रीय असल्याच्या अफवेचे लोण आता नागपुरातही पसरले असल्याचे दिसून येत आहे. त्यातून एकीकडे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून पोलिसांची डोकेदुखी वाढल्याचे दिसून येत आहे. सातत्याने सोशल मीडियावर याबाबतचे व्हिडीओ आणि संदेश व्हायरल होत असल्याने पोलिस आयुक्तांनी ट्विट करीत, अशा अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन केले.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर मुले चोरणाऱ्या टोळीबाबत व्हिडीओ आणि संदेश व्हायरल होताना दिसून येत आहेत. यामध्ये काही ठिकाणी मुले चोरणाऱ्या टोळीला नागरिकांकडून मारहाण केल्याचेही दिसून येत आहे.

टोळीकडून मुले चोरण्याची अफवा

यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातूनच गेल्या दोन दिवसांपासून नागपुरातील विविध पोलिस ठाण्यांतर्गत अशा तक्रारी पोलिसांना मिळत आहेत. त्यामध्ये जरिपटका, पाचपावली, यशोधरानगर, गिट्टीखदान आणि मानकापूर परिसरात अशाच प्रकारे टोळीद्वारे मुले पळविण्याची अफवा पसरली. पोलिसांनी याबाबत तपास केला असता, ती अफवाच असल्याचे आढळून आले. मात्र, सातत्याने अशाप्रकारच्या अफवांनी शहरात एकच खळबळ माजली असल्याचे दिसून येत आहे.

पोलिस आयुक्तांचे ‘ट्विट’

शहरात व्हिडीओ आणि संदेशाच्या माध्यमातून मुले चोरणाऱ्या टोळीबाबत अफवा पसरविण्यात येत असल्याने अशी कुठलीही टोळी नसून त्यावर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे. याशिवाय मुलांच्या सुरक्षिततेबाबत शहर पोलिसांद्वारे प्राधान्यक्रमाने आवश्‍यक त्या उपाययोजना नेहमीच केल्या असून नागरिकांनीही त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

अफवा पसरविल्यास कारवाई

सोशल मीडियाच्या माध्यमातून येणारे कुठलेही व्हिडीओ, ऑडिओ, लिंक आणि संदेश व्हायरल करू नका असेही आवाहन पोलिसांकडून करण्यात आले असून असे संदेश आल्यास पोलिसांना कळवावे. अशाप्रकारे अफवा पसरविणाऱ्यांवरही कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.