नागपूर : ‘बत्ती गुल’ चा नागपूरकरांना संताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Citizens face problem to Power outage

नागपूर : ‘बत्ती गुल’ चा नागपूरकरांना संताप

नागपूर : गेल्या तीन दिवसापासून शहरातील विविध भागात वीज पुरवठा वेळोवेळी खंडित होत असल्याने नागपूरकरांमध्ये मोठा संताप आहे. मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात कधी रात्री तर कधी भर दुपारी वीज पुरवठा खंडित होत असल्याने महावितरण विरोधात नागरिकांचा मोठा रोष निर्माण झाला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून खरबी, नंदनवन, वाठोडा, हिवरी नगर, सक्करदरा, रघुजीनगर, मानेवाडा, उत्तर आणि दक्षिण नागपुरातील बराचसा भाग, पूर्व नागपुरातील सुद्धा बराचसा भाग आधी भागात गेल्या तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होत आहे. कुठे रात्री १२ वाजता वीज पुरवठा खंडित होणे, कुठे एक तास, कुठे दोन तर कुठे चार तास वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरू आहे. भर उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागपूर जिल्ह्यात खापरखेडा आणि कोराडीमध्ये वीज निर्मिती होते. त्यामुळे शहरात अखंडित वीज पुरवठा होण्याची अपेक्षा मोठ्या प्रमाणात आहे.

मात्र, ही अपेक्षा गेल्या तीन दिवसांपासून फोल ठरली आहे. रात्री कधीही वीज पुरवठा खंडित होत असल्याने उकाड्यामुळे नागरिकांनी रात्र जागून काढली आहे. यात लहान मुलांसह वृद्धांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये महावितरण विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. असाच प्रकार आणखी सुरू राहिल्यास महावितरण कार्यालयात नागरिकांचा रोष उफाळून येण्याची शक्यता आहे.

मंगळवारी १० मे रोजी रात्री महापारेषणच्या खापरखेडा येथील उपकेंद्रात वाढलेल्या वीज भारामुळे ‘वेव्ह ट्रॅप’च्या कंडक्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे २२० किव्हो वीज वहन करणारी खापरखेडा- कन्हान लाईन साधारणतः ११.३० वाजताच्या सुमारास नादुरुस्त झाली होती. त्याचप्रमाणे वाठोडा आणि निर्मल नगर उपकेंद्रात सुद्धा समस्या उद्भवली होती. परिणामी वीज पुरवठा बाधित होऊन नागपूर शहर व ग्रामीण भागातील महावितरणच्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागला असल्याचे महावितरणने स्पष्ट केले.

महावितरणचे सहकार्याचे आवाहन

वाढलेली प्रचंड उष्णता त्यामुळे एसी व कुलर्सचा वाढलेला मोठ्या प्रमाणातील वापर यामुळे महावितरणच्या वीज यंत्रणेवर अतिरिक्त ताण निर्माण झाल्यामुळे मागील तीन दिवसात नागपूर शहरातील काही भागात वीज पुरवठा बाधित झाला होता. अखंडित व योग्य दाबाचा वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण तत्पर आहेच. परंतु, सध्याची स्थिती लक्षात घेता या काळात ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: Nagpur Citizens Face Problem To Power Outage

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top