
Nagpur : शहर पोलिस आयुक्तपदी कुणाची वर्णी?
नागपूर : नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. तरीही आयुक्तांची गुन्हेगारांवरील कारवाईची बॅटिंग सुरू असून ते अद्यापही ‘नॉटआऊट’ आहेत. पोलिस आयुक्तांच्या कार्यकाळाचा शहरात सुरू असलेल्या कसोटी सामन्यानंतर आगामी कर्णधार कोण? याची जोरदार चर्चा उपराजधानी ते राजधानीपर्यंत सुरू झाली आहे.
नागपूर पोलिस आयुक्त पदाच्या शर्यतीत मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात प्रधान सचिव असलेले संजय सक्सेना आणि अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांचे नाव आघाडीवर आहे. आयुक्तपदी वर्णी लावण्यात कोण ‘सक्सेस’ होईल याकडे पोलिस वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आयुक्तालयाच्या कर्णधारपदी या दोघांची वर्णी लागते की मधेच ‘कृष्णा’सारखे विश्वरुप धारण करीत कुणीतरी आपला ‘प्रकाश’ पाडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राज्यात गेल्यावर्षी जून महिन्यांपासून पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार होत्या. मात्र, त्यास सत्ताबदलाचा फटका बसला. त्यानंतरही मंत्र्यांचे एकमत होत नसल्याने
शहर पोलिस आयुक्तपदी कुणाची वर्णी?
पुन्हा शीर झाला. दरम्यान पोलिस उपायुक्त दर्जाच्या बदल्या दोन टप्प्यात करीत, जवळपास १२० च्या आसपास अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. मात्र, त्यानंतरही पोलिस महानिरीक्षक, अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आणि बदल्यांची यादी आलेली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. आता एका महिन्यात ही यादी येण्याची शक्यता आहे.
आयपीएस कृष्णप्रकाश शर्यतीबाहेर ?
शहर पोलिस आयुक्तापदाच्या शर्यतीत विशेष पोलिस महानिरीक्षक (व्हीआयपी)कृष्णप्रकाश हे प्रथम क्रमांकावर असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात शहर पोलिस दलात चांगलीच रंगली आहे. नागपूरचे पोलिस आयुक्त पद हे अप्पर पोलिस महासंचालक दर्जाचे आहे.
मात्र, ते ९९ बॅचचे असल्याने त्यांना या पदापर्यंत पोहचण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे ते आयुक्तपदाच्या शर्यतीबाहेर जातील, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे ते नागपुरात आले तर सहपोलिस आयुक्त म्हणूनच येऊ शकतात, हे विशेष