
Nagpur : सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पुन्हा महागणार
नागपूर : मालमत्ता खरेदीच्या बेतात असाल तर घाई करा, अन्यथा तुमच्या खिशावर अधिकचा भार आल्याशिवाय राहणार नाही. कारण रेडीरेकनरच्या दरात एप्रिलपासून वाढ होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. ही दरवाढ ग्राहकांची डोकेदुखी ठरणार असून सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पुन्हा महागणार आहे.
कोरोनामुळे अनेकांच्या आर्थिक उत्पन्न कोलमडले. मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर याचा विपरित परिणाम झाला. त्यामुळे रिअल इस्टेट व्यवसाय मंदावला होता. रेडीरेकनरचे दर जास्त असल्याने लोकांचा कल मालमत्ता खरेदीकडे कमी होता. त्यामुळे दर न वाढविण्याची मागणी व्यावसायिकांकडून करण्यात आली होती. त्यामुळे कोरोना काळात मुद्रांक शुल्कात कपात करण्यात आली होती. त्याचा सकारात्मक परिणामतही दिसून आला. व्यवहारात वाढ झाली. परंतु शासनाच्या
सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पुन्हा महागणार
उत्पन्नावर याचा परिणाम झाला. त्यामुळे मागील वर्षी रेडीरेकनरच्या दरात वाढ करण्यात आली होती. यावर्षीही यात पुन्हा वाढ होणार असल्याचे समजते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ३ ते ८ टक्क्यांपर्यंत ही वाढ होण्याची शक्यता आहे.
तसे विभागाकडून प्रस्तावित करण्यात आले आहे. ज्या शहरात मागील वर्षी वाढ कमी होती तेथे साधारणतः ५ ते ८ टक्के व इतर भागात ३ ते ५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ १ एप्रिलपासून लागू होणार आहे. त्यामुळे सरकार यात किती वाढ करते, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
दराच्या आधारेच मोबदला
मालमत्तेचे शासकीय दर निश्चित करण्यासाठी रेडीरेकनरचा आधार घेण्यात येतो. या आधारेच मुद्रांक शुल्क आकारण्यात येते. जमिनीचे संपादन करताना मालकाला या दराच्या आधारेच मोबदला देण्यात येतो.
मागील वर्षी १ टक्के वाढ
आर्थिक वर्ष संपायला अद्याप आठ दिवस आहेत. गेल्या वेळी नागपूर शहरात ३.३८, एनएमआरडीए क्षेत्रात ३.२० तर ग्रामीण भागात ३.३२ टक्के वाढ करण्यात आली होती. त्याच प्रमाणे मुद्रांक शुल्कात १ टक्का वाढविण्यात आला होता.