Nagpur: संविधान संस्कृती झाली एक चळवळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संविधान पार्क

नागपूर : संविधान संस्कृती झाली एक चळवळ

नागपूर : देशाचे संविधान प्रत्येक भारतीयाच्या हिताचे आहे. उद्देशिकेचे वाचन आता सर्वत्र होत आहे. ही संविधान वाचन संस्कृती आता संविधान वचनबद्धतेच्या दिशेने नेण्याचा उद्देश ठेवून उत्तर नागपुरातील बेझनबाग पटांगणात संविधान पार्क उभारण्याचे काम पूर्णत्वास येत आहे. या संविधान पार्कमध्ये संविधान शिलालेखाचे काम पूर्ण झाले आहे. उपराजधानीतून भारताच्या एकसंधतेचा नकाशा म्हणजे संविधान पार्क आहे, हा संदेश यातून देण्याचा प्रयत्न आहे.

निवृत्त प्रशासकीय अधिकारी ई.झेड.खोब्रागडे यांनी समाजात संविधान रुजविण्यासाठी केलेला प्रयत्न मोलाचा ठरला. आता संविधान एक चळवळ बनली आहे. उत्तर नागपुरात महानगरपालिकेच्या सहकार्यातून संविधान पार्कच्या माध्यमातून ही संविधान संस्कृती वस्तीपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आहे. संविधान पार्क हे एक आकर्षण ठरणार आहे.

हेही वाचा: आता विभाजीत भारताला अखंडित बनवायला हवं - मोहन भागवत

१८ फूट उंच असा संविधान शिलालेख पूर्ण झाला असून तो नजरेत भरणार आहे. जपानी वास्तुकलेवर आधारित बुद्धिस्ट थीम पार्क आणि संविधान पार्क आता नागरिकांसाठी लवकरच खुला करण्यात येणार आहे. या संपूर्ण परिसरात तथागत गौतम बुध्द आणि संविधानाचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र व मौलिक विचार दर्शविणारे ७ म्युरल तयार करण्यात आले आहे. वास्तु शिल्पकार आर्किटेक्ट उदयदत्त गजभिये आहेत.

आज ‘वॉक फॉर संविधान’

संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी सात वाजता अण्णाभाऊ साठे चौक (दीक्षाभूमी) ते संविधान चौक ‘वॉक फॉर संविधान’चे आयोजन केले. ‘वॉकथॉन’मध्ये शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन संविधान फाऊंडेशनचे प्रा. डॉ. महेंद्रकुमार मेश्राम व ‘खूप लढलो बेकीने, आता लढूया एकीनेच’ टीमचे अतुलकुमार खोब्रागडे यांनी केले.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

संविधान दिनाचे महत्त्व

लोकशाही, मूलभूत मानवी अधिकार, सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारा मौलिक दस्तावेज म्हणजे आपली भारतीय राज्यघटना आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान देशाला बहाल केले आणि २६ जानेवारी १९५० रोजी हे संविधान देशाला लागू झाले. म्हणून दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केल्या जातो.

२२ प्रतिज्ञांचा स्तंभ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी अस्पृश्य समाजाला तथागत बुद्धांचा धम्म दिल्यानंतर २२ प्रतिज्ञा दिल्या होत्या. या प्रतिज्ञा म्हणजे समाजाच्या एकूणच प्रगतीची पावले आहेत. यामुळे २० फूट उंच असा फलक तयार करून त्यावर प्रतिज्ञा कोरल्या जाणार आहेत. याचे सामूहिक वाचन वारंवार होणार आहे. याशिवाय ज्ञानसाधनेसाठी सभागृह तर व्यक्तित्व विकासासाठी ग्रीन जीम देखील तयार होणार आहे.

संविधान पार्क आणि बुद्धिस्ट पार्कमध्ये तथागत गौतम बुद्धांची १२ फूट उंच अशी मूर्ती स्थापना करण्यात येणार आहे. संविधान पार्कच्या हिरवळीवर संविधान स्तंभ, राजमुद्रा असलेला १५ फूट उंचीचा अशोक स्तंभ उभारण्याचे कार्य सुरू आहे. बेझनबाग हे बुद्धिस्ट पर्यटनस्थळ म्हणून घोषित व्हावे.

- अशोक कोल्हटकर, माजी जनसंपर्क अधिकारी महापालिका.

loading image
go to top