Nagpur : देशाचे संविधान सुरक्षित ; माजी सरन्यायाधीश शरद बोबडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur

Nagpur : देशाचे संविधान सुरक्षित ; माजी सरन्यायाधीश शरद बोबडे

नागपूर : देशातील सध्याच्या राजकीय वातावरणामुळे देशाचे संविधान धोक्यात आले आहे, अशी शंका येऊ शकते. मात्र, हा पूर्णत: गैरसमज आहे. देशाचा माजी सरन्यायाधीश म्हणून आज सर्वांसमोर ग्वाही देतो की देशाचे संविधान पूर्णपणे सुरक्षित आहे, असे उद्‍गार माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी काढले आहे. बोबडे यांना २०२१ या वर्षीचा नागभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

सोहळ्यात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. हरीश साळवे २०१९ तर स्वतंत्रता सेनानी व समाजसेविका लीलाताई चितळे यांना २०२० या वर्षीचा नागभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद नागभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष भाजपाचे माजी खासदार अजय संचेती यांनी भूषविले. मंचावर फाउंडेशनचे कार्याध्यक्ष विलास काळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

विकास सिरपूरकर म्हणाले, संपूर्ण नागपूरसाठी मातेसमान असलेल्या लिलाताईंनी संविधानाच्या सुरक्षेवर शंका व्यक्त केली. मात्र, देशाचे सर्वोच्च न्यायालय संविधान कधीही धोक्यात येऊ देणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची रचना करताना तशी तरतूद केली आहे. यामुळे, भारतीय संविधान सदैव सुरक्षित राहील, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांच्यासह माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी आपल्या नागपूरमधील जुन्या आठवणींना उजाळा दिला. माजी खासदार अजय संचेती यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास काळे यांनी केले. तर, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲड. निशांत गांधी यांनी केले. कार्यक्रमाला न्यायमूर्ती अनिल किलोर, न्यायमूर्ती अविनाश घरोटे, एचसिबीएचे अध्यक्ष ॲड. अतुल पांडे, माजी आमदार डॉ. गिरीश गांधी, डिबीएचे अध्यक्ष ॲड. कमल सतुजा, सचिव ॲड. नितीन देशमुख आणि विधी क्षेत्रासह इतर मान्यवर उपस्थित होते.

लिलाताईंची विधी क्षेत्राला साद

कार्यक्रमाला विधी क्षेत्रातील अन् मुळचे नागपूरकर असलेल्या मान्यवरांना ९३ वर्षीय लिलाताईंनी आर्त हाक दिली. ‘आपण आज सर्व एकत्रित आल्याने मला माझ्या वेदना सांगायच्या आहेत. आपले संविधान आज धोक्यात आहे. देशामध्ये समानता नाही. संविधानाला बळकटी देणे आपल्या सारख्या लोकांचे काम आहे. आज या वयातही मी खूप चिंतेत आहे. आम्ही लोकांनी स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या देशातील संविधान सुरक्षीत असल्याचे खात्री आम्हाला द्यावी, असे लीलाताई यावेळी म्हणाल्या.

टॅग्स :NagpurConstitution