
नागपूर : वाकलेल्या झाडांमुळे वाहतुकीस अडथळा
नागपूर - सततच्या पावसामुळे रस्त्याच्या बाजूची वनराई चांगलीच बहरली आहे. परंतु रस्त्यांच्या कडेला असलेल्या या झाडांच्या फांद्या वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शहरातील गोपालनगर, त्रिमूर्तीनगर, नरेंद्रनगर, मनीषनगरातील अरुंद रस्त्यांवर आलेल्या फांद्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अनेक रिकाम्या प्लॉटमधील रोपटी वाढल्याने स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
झाडांच्या समस्येबाबत काही नागरिकांनी ‘सकाळ’कडे गाऱ्हाणे मांडले. शहरातील जवळपास सर्वच वस्त्यांमध्ये ही समस्या भेडसावत आहे. ऐन रस्त्याच्या वळणावर झाडांच्या फांद्या वाढल्याने दुचाकीस्वारांना विरुद्ध दिशेने येणारे वाहन दिसत नाही. यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. पलीकडून अचानक वाहन समोर आल्याने चालकदेखील भांबावतात. तसेच, मोकळ्या जागेत वृक्ष वाढल्याने जागा अस्वच्छ झाली आहे. अशा मोकळ्या जागा पाहून नागरिक कचरा आणून टाकतात. याचा परिसरातील नागरिकांना त्रास होतो.
झोन कार्यालयात द्या तक्रार
झाडांच्या फांद्या वाढल्या किंवा झाडे वाकली असल्यास अशा तक्रारींचे निवारण महापालिकेच्या संबंधित झोनतर्फे करण्यात येते. नागरिक आपल्या झोन कार्यालयात सहाय्यक आयुक्त किंवा उद्यान विभागाच्या झोन समन्वयकाला पत्र देऊन तक्रार करू शकतात.
खासगी व्यक्तींकडून वृक्षतोड
पावसाळ्याला सुरुवात झाल्यावर काही समूह रोजगार म्हणून अशा फांद्या तोडण्याची कामे करतात. महापालिकेच्या संथ कारभारामुळे रहिवासी अशा समूहाला पैसे देत या वाढलेल्या झाडांना छाटण्याचे काम त्यांच्या हाती देतात. अनेकदा सर्रासपणे वृक्षतोड करीत नियमांचे उल्लंघनसुद्धा या खासगी व्यक्तींकडून होते.
प्रत्येक ऋतूचा पर्यावरणावर परिणाम होतो. त्यानुसार महापालिकेने काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच जून महिन्यामध्ये संबंधित विभागाने मोहीम हाती घेणे गरजेचे होते. यामुळे पाणी साचणे, डासांचा प्रादूर्भाव निर्माण होण्यासह रोगराई पसरणार नाही.
-शिल्पा बोडखे