Nagpur Crime : पिस्तुलसह शस्त्रांचा साठा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Crime

Nagpur Crime : पिस्तुलसह शस्त्रांचा साठा जप्त

नागपूर : पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ठक्करग्राम परिसरात कुख्यात गुंडाच्या घरातून एक पिस्तुल, माऊजर आणि ८ जिवंत काडतुसांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी दोघांनाही पाचपावली पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

शशांक सुनील समुद्रे (वय २३, रा. पाचपावली ठक्करग्राम) आणि अभय अजय हजारे (वय २२, रा. बाळाभाऊपेठ) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ठक्करग्राम परिसरात राहणारा कुख्यात गुंड शशांक याच्याकडे शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी घराच्या झडतीत एक पिस्तुल, ८ जिवंत काडतूस, सात तलवारी, एक कोयता आणि दोन चायनामेड चाकू आढळले. यावेळी त्याला ताब्यात घेत पोलिसांनी पिस्तुल नेमके कुठून आणले? याबाबत जाब विचारला असता, त्याने अभय हजारेकडून दहा दिवसांपूर्वी खरेदी केल्याचे सांगितले. पोलिसांनी बाळाभाऊपेठ येथील अभय हजारेचा शोध घेतला असता, त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत एक माऊजर आढळले. यावेळी अभयने पिस्तूल आणि माऊजरची खरेदी विलास कटारे (रा. कांजीहाऊस) याचाकडून केल्याचे सांगितले. विलास कटारे अद्याप फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान या शस्त्राच्या सहाय्याने दोघेही शहरात मोठ्या कारवाईला पूर्णत्वास नेण्याच्या तयारीत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करीत, त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना १ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मेंढे, गुन्हे पोलिस निरीक्षक रवी नागोसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रांत थारकर, उपनिरीक्षक अविनाश जायभाये, रहेमत शेख, हवालदार विजय यादव, शिपाई अमित सातपुते, प्रकाश राजपल्लीवार, नितीन वर्मा, पवन भटकर, अंकुश राठोड, वासुदेव जयपुरकर, गणेश ठाकरे, राजू श्रीवास, शहनवाज मिर्जा यांनी पार पाडली.

दोघेही अट्टल गुन्हेगार

पाचपावली पोलिसांनी ताब्यात घेतलेले अभय हजारे आणि शशांक समुद्रे हे दोघेही अट्टल गुन्हेगार आहेत. अभयवर यशोधरानगर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल असून, गंभीर जखमी करणे, दंगल पसरविणे, शस्त्र बाळगणे आदी अनेक गुन्हे दाखल आहेत. याशिवाय शशांकवरही खून वगळता सर्वच गुन्हे दाखल आहेत.

दोन दिवसांपूर्वी दाखविला पिस्तुलचा धाक

अभय आणि शशांक यांनी दोन दिवसांपूर्वी पाचपावली पुलाखाली एकाला शस्त्राचा धाक दाखवीत धमकाविल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्याचे आवाहन केले आहे.