Nagpur Crime : नागपुरात एक कोटीचा गांजा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganja

Nagpur Crime : नागपुरात एक कोटीचा गांजा जप्त

नागपूर : शहर पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीचा बेत हाणून पाडत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या १५०० किलो गांजा ट्रकमधून जप्त करून ट्रक चालक व क्लिनरला अटक केली. नागपुरात आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा शहरात येत असल्याने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना गांजा शहरातून जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी गुन्हे शाखेचे सामाजिक सुरक्षा पथक, पारडी पोलिस आणि अमली पदार्थ विरोधी पथकाला सापळा रचण्याचे आदेश दिले.

एक कोटीचा गांजा जप्त

सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी बुधवारी पहाटेपासूनच शहराच्या मुख्य मार्गावर तैनात होते. पहाटेच्या सुमारास दोन तास वेगवेगळ्या ट्रकची तपासणी केल्यानंतर पोलिसांच्या काहीच हाती लागले नाही. त्यानंतर पथकाला ए.पी.१६/ टी.ए.७३४९ क्रमांकाचा ट्रक येताना दिसला. पोलिसांना त्याच्याबद्दल संशय आल्याने त्यांनी त्याला अडविले.

चालकाला विचारणा केली असता त्याने त्यात सामान असल्याचे सांगितले. ही गांजाची खेप बीड जिल्ह्यात जात होती. तेथे हा माल स्वीकारणाऱ्यांना बीड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी ट्रकच्या चालक आणि साथीदाराला ताब्यात घेतले आहे. यातील पुरवठादार, वाहतूकदार, माल स्वीकारणारे तसेच ग्राहक या संपूर्ण रॅकेटचा छडा लावण्यासाठी एक पथक स्थापन करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

खताच्या पोत्यात गांजा

पोलिसांनी सामान हटवून पाहणी केली असता त्यांना खताच्या पोत्यांमध्ये मोठ्याप्रमाणात गांजा भरलेला असल्याचे निदर्शनास आले. संपूर्ण ट्रक खाली करायला पोलिसांना दोन तास लागले. हा गांजा मराठवाड्यातील बीड येथे जात होता. ओडिशातून नागपूरमार्गे दक्षिण भारतात गांजाची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने काही मार्ग आम्ही तपासणीसाठी निवडल्याचे अमितेशकुमार यांनी सांगितले.