
Nagpur : बाळ विक्री प्रकरणात डॉक्टरला नोटीस
नागपूर : बाळ विक्रीच्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेली श्वेता ऊर्फ आयेशा खानने गुजरातला विकलेल्या नवजात बाळ विक्रीचे प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने एका डॉक्टरला नोटीस देण्यात आली आहे. तसेच श्वेता खानला तिच्या प्रत्येक गुन्ह्यात मदत करणाऱ्या पती मकबूल खानलाही पथकाने अटक केली.
डॉ. प्रवीण रतनसिंग बैस (वय ३९,रा. न्यू बिडीपेठ, संतोषी माता नगर) असे या डॉक्टरचे नाव असून मकबूल खान (वय ४३ रा. आमोली घाट, लालबर्रा, बालाघाट) असे श्वेता खानच्या पतीचे नाव आहे. डॉ. प्रवीण बैस याचे वर्धेला चाइल्ड क्लिनिक आहे. गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे प्रकरणाचा तपास करीत असताना सीमा ऊर्फ परवीना अन्सारी आणि श्वेता खान यांच्याकडे डॉ. प्रवीण रतनसिंग बैस यांच्या क्लिनिकची फाइल आढळून आली. श्वेता खान मुले दत्तक मिळवून देण्यात मदत करीत असल्याची बतावणी बैसने क्लिनिकमध्ये आलेल्या दाम्पत्यांना केल्याचे उघड झाले.
अधिक चौकशी केल्यानंतर डॉक्टरला नोटीस देण्यात आली. यापूर्वी त्याचे नागपूरलाही क्लिनिक होते. मात्र, ते बंद करीत वर्धेला थाटले. तिथे क्लिनिकमध्ये येणाऱ्या दाम्पत्यांना श्वेता खानकडे पाठवीत असल्याची माहिती समोर आली आहे. पथकाद्वारे मकबूल खान याला अंबाझरी तर डॉ.प्रवीण गौर याला हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी सहाय्यक पोलिस निरीक्षक रेखा संकपाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन चांभारे, पोलिस हवालदार ज्ञानेश्वर ढोके, पोलिस हवालदार मनीष पराये, पोलिस हवालदार राजेन्द्र अटकळे, नायक पोलिस सुनील वाकडे, नायक पोलिस शरीफ शेख, अंमलदार ऋषीकेश डुमरे, महिला पोलिस शिपाई पल्लवी वंजारी यांनी पार पाडली.
श्वेताच्या क्लिनीकचीही होणार तपासणी
श्वेताने डॉक्टर असल्याची बतावणी करीत, बालाघाट येथे एक चाइल्ड क्लिनिक थाटले होते. त्या माध्यमातून तिने बाळाच्या विक्रीचा गोरखधंदा सुरू केला होता. त्यामुळे तिच्यावर सध्या चार प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे आता पथकाद्वारे तिच्या बालाघाट येथील क्लिनिकचीही तपासणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.