
Nagpur Crime : श्वेताने चिमुकलीला विकले गुजरातला
नागपूर : कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतून आठ महिन्यांच्या बाळाला विकण्याच्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या श्वेता खानचे आणखी एक नवजात बाळ विक्रीचे प्रकरण समोर आले. तिने गुजरातच्या दाम्पत्याला ४ दिवसाच्या नवजात बाळाची विक्री केल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी श्वेता खान विरोधात चौथा गुन्हा दाखल केला.
विनय सुलतयानी (वय ३६, रा. वारासिया वडोदरा) आणि त्यांची पत्नी मोनिका विनय सुलतयानी (वय ३१), विशाल चंदवानी अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तपासात गुन्हेशाखेद्वारे सीमा ऊर्फ परवीन अन्सारी (वय ४०) व श्वेता ऊर्फ आयेषा खान (वय ४५) आणि सचिन पाटील (वय ४०) यांची चौकशी केली.
यावेळी त्यांनी दोन महिने कविता मेश्राम नामक एका विधवा महिलेला बालाघाट येथे स्वतःच्या घरी प्रसूतीसाठी ठेवून घेतले. ४ सप्टेंबरला तिला मूल होताच, चार दिवसांनी ते बाळ गुजरात येथील वडोदरा शहरात राहणारे डेकोरेशन व कापड व्यावसायिक विनय सुलतयानी (वय ३६, रा. वारासिया वडोदरा) आणि त्यांची पत्नी मोनिका (वय ३१) यांना विकले. यासाठी मधस्त म्हणून विनय सुलतयानी यांचा साळा विशाल चंदनानी याच्याशी श्वेताने ६ सप्टेंबरला संपर्क साधला. त्यानंतर सिंधी समाजाची एक गुडीया दोन दिवसाची असून तिला द्यायचे असल्याचे कळविले. त्यानुसार विशालने आठ सप्टेंबरला ४ दिवसांच्या नवजात बालिकेची २ लाख ९० हजारात विक्री केली. याबाबत माहिती मिळताच पथकाने तिघांना ताब्यात घेऊन बालिकेला परत आणले. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
आणखी गुन्हे येणार उघडकीस
श्वेता ऊर्फ आयेशा खान हिच्यावर चार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असताना, आता तपासादरम्यान आणखी काही प्रकरणे समोर येणार असल्याची शक्यता आहे. श्वेता व तिच्या साथीदारांनी अशाप्रकारे इतरही ठिकाणाहून मुले पळविल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली. राज्याबाहेरही या प्रकरणाची पाळेमुळे असल्याची शंका पोलिस आयुक्तांनी व्यक्त केली.