नागपूर : दीक्षाभूमीवर २२ प्रतिज्ञांचा गजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur

नागपूर : दीक्षाभूमीवर २२ प्रतिज्ञांचा गजर

नागपूर : तथागत गौतम बुद्धाचा मार्ग अनुसरून शांती व कल्याणाची प्रतिज्ञा घेत सोमवारी (ता.३) देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो बांधवांनी मध्यरात्रीनंतरही धम्मदीक्षा घेतली. ५ हजारांवर अनुयायांनी धम्मदीक्षा घेतली. पहिल्यात दिवशी ५ हजार व्यक्तींनी दीक्षाभूमीवर २२ प्रतिज्ञांचा गजर केला. मंगळवार (ता.४) आणि धम्मचक्र प्रवर्तनदिनी असे सलग तीन दिवस धम्मदीक्षा घेता येणार आहे. तीन दिवसांत सुमारे एक लाख व्यक्ती धम्मदीक्षा घेतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत सकाळी ९.३० वाजता धम्मदीक्षा सोहळा सुरू होऊन बुद्धवंदना देण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष धम्मदीक्षेला सुरुवात झाली. कर्नाटक, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल व देशाच्या इतरही भागातून मोठया संख्येत अनुयायी आले. उपासकानी स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाला अभिवादन केले. अनुयायांनी धम्मदीक्षा सोहळ्याच्या स्थळी गर्दी केली. एकावेळी शंभरावर बांधवांकडून २२ प्रतिज्ञाचे वाचन करण्यात येत होते. अशाप्रकारे पहिल्या दिवशी सुमारे ५ हजार व्यक्तींनी २२ प्रतिज्ञा ग्रहण केल्या. धम्मदीक्षा सोहळ्यात बच्चे कंपनीपासून तर वृद्धांचाही समावेश होता. दोन दिवसांपासून दीक्षाभूमीवर धम्मदीक्ष घेणाऱ्यांची गर्दी होत आहे. भदंत सुरेई ससाई यांच्या हातून दीक्षा घेणाऱ्यांना बरीच उत्सुकता असते. धम्मदीक्षा देण्याआधी भन्ते सुरई ससाई यांनी प्रबोधन केले.

अशी होते धम्मदीक्षा

धम्मदीक्षा देणाऱ्यांना एक अर्ज आधी भरून द्यावा लागतो. त्यात त्यांचे पूर्ण नाव, पत्ता व धम्मदीक्षा घेण्याबाबत इतर माहिती घेतली जाते. हा फॉर्म भरून घेतल्यानंतर धम्मदीक्षा दिली जाते. यानंतर शेजारीच असलेल्या तरुणांचे एक पथक धम्मदीक्षा घेणाऱ्या व्यक्तीचा अर्ज जमा करून त्यांना धम्मदीक्षा दिल्याचे प्रमाणपत्र देतात. दीक्षाभूमी भाविकांनी फुलत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात धम्मदीक्षा घेणाऱ्यांचा आकडा लाखाच्या घरात जाणार आहे.