Nagpur : लोकशाहीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाहीचे संकट ; नाना पटोले Nagpur dictatorship over democracy Nana Patole Prime Minister Narendra Modi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nana Patole and Narendra Modi

Nagpur : लोकशाहीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाहीचे संकट ; नाना पटोले

नागपूर : लोकशाहीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाहीचे संकट आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबांतील राहुल गांधी यांना राष्ट्रद्रोही म्हणण्याची मानसिकता असलेल्यांविरोधात आमचा लढा आहे.

अदानी यांना दिलेला पैसा कुणाचा, या प्रश्नामुळे राहुल गांधी यांच्याविरोधात षडयंत्र करून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. यापूर्वी इंदिरा गांधी यांच्या वाट्याला जाण्याची चूक तत्कालीन नेत्यांनी केली अन् त्यांचे पतन झाले. अगदी तीच चूक आताचे सरकार करीत असल्याचे नमुद करीत कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारलाच इशारा दिला.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याने आज संतप्त कॉँग्रेस नेत्यांनी संविधान चौकात दिवसभर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार, शहर कॉँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे, ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार ॲड. अभिजित वंजारी, माजी मंत्री अनिस अहमद

लोकशाहीवर हुकूमशाहीचे संकट

यांच्यासह सर्वच प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. धरणे आंदोलनानंतर सायंकाळी पत्रकारपरिषदेत नाना पटोले यांनी नीरव मोदी, ललित मोदी हे लुटारू असून ओबीसी नव्हे, असे सांगितले. मी सुद्धा एक ओबीसी असून ओबीसी समाज हा देशाला देणारा असतो, लुटणारा नाही, असे भाजपच्या ओबीसीप्रेमावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

देशातील जनतेचे प्रतिनिधीत्व करताना सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे हे लोकशाहीत विरोधी पक्षाचे काम आहे. परंतु भाजपला सत्तेची गरमी चढली असून ते उतरविण्यासाठी लढा देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. कॉँग्रेसने देशाला उभे केले. आता संविधान वाचविण्यासाठी कॉँग्रेस कार्यकर्त्यांना दिवस-रात्र काम करावे लागणार असल्याचेही ते म्हणाले.

तत्पूर्वी आज सकाळपासून संविधान चौकात नाना पटोले यांच्या नेतृत्त्वात धरणे देण्यात आले. यावेळी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याबाबत कॉँग्रेस नेत्यांनी भाजप सरकारविरोधात संताप व्यक्त करीत निषेध केला. आंदोलनात प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, उमाकांत अग्निहोत्री, विशाल मुत्तेमवार, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, रमेश पुणेकर यांच्यासह महिला आघाडी, युवक कॉँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बुधवारी सर्वपक्षीय रॅली

केंद्रातील भाजप सरकारविरोधात येत्या २९ मार्चला मविआ तसेच समविचारी पक्षाची एकत्र रॅली काढण्यात येणार आहे. व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात होईल. संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रॅलीचे समापन होणार असल्याचे नाना पटोले म्हणाले. या रॅलीत भाजपविरोधातील सर्व पक्ष एकत्र येणार असल्याचे ते म्हणाले.