एकीचे बळ, मिळे भरघोस फळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur farming

एकीचे बळ, मिळे भरघोस फळ

नागपूर : आजच्या काळात सरकारी नोकरी मिळणे अवघड. काहींच्या मते शेती हा तोट्याचा व्यवसाय असला तरीही मेहनत व योग्य नियोजनातून चांगली भरभराट होवू शकते. एकीच्या बळाने अवघड कामही सहज होते, असा मंत्र विचारवंतांनी दिला आहे. याच एकीच्या मंत्राचा आधार घेत नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत कंपनीची स्थापन केली. याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होत आहे.

कृषिप्रधान भारत देशात अजूनही शेतीच मुख्य व्यवसाय आहे. आज हा व्यवसाय तोट्यात असला तरीही एकीच्या बळावर त्याला गतवैभव प्राप्त करता येणे शक्य आहे. नियोजनबद्ध पद्धतीने शेती केल्यास हा व्यवसाय फायद्याचा ठरू शकतो याचा वस्तुपाठ कमलेश भोयर या युवा शेतकऱ्याना घालून दिला आहे.

त्याने त्यांच्याकडे असलेल्या जमिनीचा वापर करून छोटा व्यवसाय सुरू करण्याचे उद्देशाने कन्हान व निलज गावातील शेतकरी मित्रांना सोबत घेत शेतीसंबंधित व्यवसाय सुरू करण्याचे नियोजन केले. मजुरांची टंचाई आणि बचत करण्याच्या उद्देशाने त्याने स्वखर्चाने दोन पॅडी रिपर, धान व गहू कापण्याचे यंत्र खरेदी केले. याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांचा खर्च व वेळेची बचत झाली. तसेच रोजगारही मिळाला.

पुढे त्याने फार्म प्रोड्यूस कंपनीची स्थापना करण्यात केली. कन्हान, निलज, येसंबा, सालवा, बोरडा, सिंगारदीप, खंडाळा, टेकाडी, हिवरा इत्यादी गावातील शेतकऱ्यांना सभासद बनविले. शासनाच्या ‘एक जिल्हा, एक वाण’ संकल्पनेच्या आधारे संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांना एकाच प्रकारच्या धानाचे उत्पादन घेण्यास सांगितले. विशेष म्हणजे, अनेक शेतकरी एकत्र आल्याने लागवड व भाडे खर्च कमी झाला. यामुळे निव्वळ नफ्यात वाढ झाली. या उपक्रमाशी चारशे शेतकरी जोडले गेले आहेत.

समूह शेतीवर भर

वाढत असलेला परिवार व त्यामुळे निरंतर जमिनी होत असलेले तुकडे यामुळे समूह शेती काळाची गरज बनली आहे. जमिनीच्या होत असलेल्या तुकड्यांमुळे अल्पभूधारक शेतकरी संकटात आहे. यासाठी कंपनीच्या माध्यमतून गटशेती योजना राबवीत असताना अल्पभूधारक शेतकऱ्यांना एकत्रित करत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करण्याचे मार्गर्शन व सेवा देण्याचे कार्य सुरू केले. यामुळे शेतकऱ्यांना मजुरीवर करावा लागणारा खर्चामध्ये बचत होऊन वेळेच्या आत काम होण्यास मदत झाल्याने नफा वाढला.

सेंद्रिय शेतीकडे कल

कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात असलेल्या समूह शेतीमध्ये समाविष्ट शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेती, जैविक खतांचा वापर करून कमी खर्चात जास्त फायदा कसा मिळवता येईल. तसेच आरोग्याच्यादृष्टीने व बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन सेंद्रिय शेती करण्यावर कंपनीतर्फे भर देण्यात येत आहे. प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प संचालक (आत्मा) यांच्यार्तफे कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत ढेंचा वनस्पती, सेंद्रिय खते व कीटकनाशके तसेच काळा तांदूळ व पार्वती सूत हे वाण वितरित करण्यात आले आहे.

आज जवळपास चारशे शेतकरी यात सहभागी आहेत. यात २५० नोंदणीकृत तर १५० बिगर नोंदणीकृत आहेत. येत्या काळात या सर्व शेतकऱ्यांना आवश्यक सर्व सुविधा जसे खते, बियाणे, औषधी इतर साहित्य एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न आहे. या मालाला अधिक मोठी बाजारपेठ मिळून देण्याचा प्रयत्न असून त्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे.

- कमलेश भोयर, कंपनी संचालक

गटशेतीच्या योजनेचा लाभ घेत या शेतकऱ्यांनी कंपनी उभी केली. शेतकरी एकत्र आल्याने कंपनीची भरभराट होत आहे. इतर शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. हा प्रकल्प इतरांसाठी पथदर्शी आहे. अशा प्रकारे कंपनीच्या माध्यमातून गट शेती करण्यासाठी कृषी विभाग त्यांच्या पाठीशी आहे.

- मिलिंद शेंडे, कृषी अधीक्षक, नागपूर