
आरोग्य सुविधांच्या अभावानंतरही राज्यात कोरोना प्रतिबंधक बुस्टर डोस लसीकरणात नागपूर जिल्ह्याने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
बूस्टर डोस लसीकरणात नागपूर जिल्हा दुसरा
नागपूर - आरोग्य सुविधांच्या अभावानंतरही राज्यात कोरोना प्रतिबंधक बुस्टर डोस लसीकरणात नागपूर जिल्ह्याने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जिल्हा प्रशासन व महापालिकेने नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधांमुळे जिल्ह्यातील सर्व गटातील ११.१७ टक्के नागरिकांनी बूस्टर डोस घेतला. बूस्टर डोस घेणाऱ्यांच्या यादीत राज्यात पहिल्या दहा शहरात नागपूरनंतर भंडारा जिल्ह्याचाही समावेश आहे.
राज्यात १५ जुलैपासून मोफत बूस्टर डोस देण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ दिवस, अर्थात ३० सप्टेंबरपर्यत मोफत बूस्टर देण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला. जिल्ह्यात बूस्टर डोससाठी ३० लाख ६८ हजार ८१४ नागरिक बूस्टर डोससाठी पात्र आहेत. १५ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत नागरिकांनी घेतलेल्या बूस्टर डोसची आकडेवारी आरोग्य विभागाने जाहीर केली आहे. अठरा दिवसांत नागपूर जिल्ह्यातील ३ लाख ४२ हजार ८८८ नागरिकांनी बूस्टर डोस घेतला.
ग्रामीण भागात तालुकास्तरावर, नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायतने तर शहरात महापालिकेने नागरिकांना मोफत डोससाठी लसीकरण केंद्र उपलब्ध करून दिले. महापालिकेने शहरात ४८ केंद्रांसह खाजगी रुग्णालयातही बूस्टर डोस उपलब्ध आहेत. महापालिकेच्या ४८ केंद्रांवर मोफत बूस्टर डोस देण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यापुढे पहिल्या क्रमांकावर राजधानी मुंबई आहे. मुंबई जिल्ह्यात एकूण पात्र ९७ लाख ५३ हजार ४२६ नागरिकांपैकी १२.६८ नागरिकांनी बूस्टर डोस घेतला. पुणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर असून पात्र ८४ लाख ३ हजाह ५२५ पुणेकरांपैकी १०.५८ नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. पहिल्या दहा शहरांमध्ये विदर्भातील भंडारा जिल्ह्याचाही समावेश आहे. परंतु भंडारा जिल्हा दहाव्या क्रमांकावर असून येथील पात्र ८ लाख ८२ हजार ६०५ नागरिकांपैकी ९.१८ नागरिकांनी बूस्टर डोस घेतला. बूस्टर डोस लसीकरणाबाबत नांदेड, बुलढाणा जिल्ह्यात अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. येथील केवळ तीन टक्के नागरिकांनी बूस्टर डोस घेतला.
नागपूर शहर तिसऱ्या स्थानी
शहरात पंधरा दिवसांत एक लाख २ हजार ८९३ नागरिकांनी बुस्टर डोस घेतला. बुस्टर डोस घेणाऱ्यांत नागपूरकर राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या क्रमांकावर मुंबई तर दुसऱ्या क्रमांकावर पुणे आहे. नागपूर शहर १०.३७ टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. लक्ष्मीनगर झोनमध्ये सर्वाधिक १८ हजार १८१ बुस्टर डोस घेण्यात आले.
जिल्ह्यातील पात्र व बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या
पात्र नागरिक बूस्टर डोस घेणारे नागरिक
३० लाख ६८ हजार ८१४ ३ लाख ४२ हजार ८८८
Web Title: Nagpur District Second In Booster Dose Immunization Coronavirus
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..