esakal | Nagpur : गांधी टोपी घालून रुग्णांवर उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur : गांधी टोपी घालून रुग्णांवर उपचार

Nagpur : गांधी टोपी घालून रुग्णांवर उपचार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अस्थायी वैद्यकीय शिक्षकांना दिलेले स्थायी करण्याचे आश्वासन सरकारने न पाळल्यामुळे संतप्त निवासी डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी गांधी जयंतीच्या पर्वावर निवासी डॉक्टरांनी गांधीगिरी केली. तर अस्थायी वैद्यकीय शिक्षकांनी संपातून माघार घेत संपाची उगारलेली तलवार पुन्हा एकदा म्यान केली.

मेडिकलमध्ये सुमारे पाचशेवर निवासी डॉक्टर आहेत. दीड हजारावर रुग्ण भरती आहेत. गंभीर रुग्णांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेत निवासी डॉक्टरांनी गांधी टोपी घालून रुग्णांवर उपचार केले. बाह्यरुग्ण विभाग आज बंद होता. तर अतिदक्षता विभागापासून तर कॅज्युअल्टीमध्ये रुग्णसेवा देताना प्रत्येक निवासी डॉक्टरने टोपी घातली होती. टोपी घालूनच मोर्चाही काढला. शुल्क माफ करण्याचा तसेच औषधांचा दुष्काळ दूर करण्याची त्यांची मागणी होती. गांधीजींच्या वेशभूषेत एक निवासी डॉक्टर संपूर्ण मेडिकलमध्ये फिरले. सुमारे चार ते पाच तासांची गांधीगिरी निवासी डॉक्टरांनी केली.

गांधी टोपी घालून रुग्णांवर उपचार

याच काळात मेयोमध्येही संप सुरू होता. दिवसभरात मेयो रुग्णालयात केवळ गंभीर रुग्ण वगळता इतरांना तपासण्यात आले नाही. मेयो आणि मेडिकलमध्ये शनिवारी बोटावर मोजण्याइतक्या शस्त्रक्रिया झाल्या.

एकीकडे तिसऱ्या लाटेचे संकट घोंघावत असताना शासन निवासी डॉक्टरांच्या हक्काच्या मागण्यांचा विचार करत नाही. अल्टिमेटम दिल्यानंतरही निवासी डॉक्टरांच्या संपाची दखल घेण्यात येत नाही. सारे आमचे पालक आहेत. २० महिने आम्ही कोरोना एके कोरोना हेच काम केले. काम करताना दिलेले आश्वासन सरकारने पाळत नाही. यामुळे संपाची वेळ आली. सेंट्रल मार्डकडून निर्णय आल्यानंतर संप मागे घेण्यात येईल.

- डॉ. सजल बन्सल, अध्यक्ष, मार्ड, मेडिकल.

सध्या निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर आहेत. त्यांचे आंदोलन सुरू आहे. यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यात चारशेवर अस्थायी सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकांनी ४ ऑक्टोबरला मुंबईत संपाचा इशारा दिला. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडून मागणीबाबत सकारात्मक उत्तर मिळाले. यामुळेच अस्थायी वैद्यकीय शिक्षकांचा संप मागे घेतला आहे.

-डॉ. समीर गोलावार, सचिव, महाराष्ट्र मेडिकल टीचर्स असोसिएशन,महाराष्ट्र.

पुन्हा एकदा आश्‍वासन

पाच वर्षांपासून अस्थायी स्वरूपात काम करणाऱ्या वैद्यकीय शिक्षकांनी ४ तारखेला मुंबईच्या आझाद मैदानात स्थायी करण्याच्या मागणीसाठी सत्याग्रह पुकारला होता. राज्यभरातून साडेचारशेवर अस्थायी वैद्यकीय शिक्षक पोचणार होत. हे सारे अस्थायी शिक्षक म्हणजे निवासी डॉक्टरांचे शिक्षक अर्थात गुरू. या साऱ्या गुरूंना पुन्हा एकदा आश्वासनाचा डोस प्रशासनाकडून मिळाला. यामुळे तिसऱ्यांदा अस्थायी वैद्यकीय शिक्षकांनी संप पुकारण्याचा दिलेला इशारा मागे घेतला.

रुग्णसेवा कोलमडली

मेयो-मेडिकलमधील ८०० निवासी डॉक्टर संपावर कॅज्युल्टीतील रुग्णसंख्या रोडावली मोठ्या शस्त्रक्रियांच्या संख्येत घट किरकोळ शस्त्रक्रियांच्या संख्येत घट

loading image
go to top