Nagpur News | उद्योजकांच्या ​स्वप्नाला सुरुंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Entrepreneur dream

नागपूर : उद्योजकांच्या स्वप्नाला सुरुंग

नागपूर : मंदीत होरपळलेल्या उद्योगांना करात सवलत नाही, पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर, विजेचे दर कोणत्याही उद्योगाला न परवडणारे असताना वसुली मात्र सक्तीची होताना दिसून येते. त्यामुळे अनेक नवोदित उद्योजकांच्या स्वप्नांचा चुराडा झाल्यासारखे वाटत आहे. लॉकडाउननंतर आता पुन्हा व्यवसाय सुरू झाले. मात्र, कच्चा मालाचे वाढलेले भाव आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून उशिरा मिळणारे बिल. यामुळे नागपूर जिल्ह्यातील उद्योगांचे ४० टक्के उत्पादन ठप्प झालेले आहे.

हेही वाचा: हालचाली वाढल्या; नितेश राणेंचे पीए राकेश परब पोलिसांना शरण

कच्चा माल आणि सिमेंट, स्टील, इंधनाच्या दरात सतत वाढ होत आहे. त्यामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवर परिणाम झाला. राज्यात दोन वर्षांपेक्षा आता परिस्थिती बदलली आहे. हे क्षेत्र आता कोसळण्याच्या मार्गावर आहे. या क्षेत्राची स्थिती अत्यंत नाजूक असून या क्षेत्राला सावरण्याचा प्रयत्न राज्य आणि केंद्र सरकारकडून करणे अपेक्षित आहे. इंधनाचे दर वाढल्याने परिवहन खर्चही वाढलेला आहे. दुसऱ्या लाटेनंतर उद्योगाला चांगले दिवस येऊ लागले होते. मात्र, इंधनाच्या दरासह कच्च्या मालाचे दर वाढल्याने पूर्वी घेतलेल्या मालाच्या ऑर्डरची पुर्तता उद्योजकांनी केली. आता वाढलेल्या दरात नवीन ऑर्डर मिळणे कठीण झालेले आहे.

त्यामुळे उद्योजकांनी उत्पादन कमी केलेले आहे. परिणामी, ४० टक्के उत्पादन ठप्प झालेले आहे. तसेच पुरवठा केलेल्या मालाची बिलेही राष्ट्रीयकृत संस्था, शासकीय संस्थाकडून वेळेत मिळत नाहीत. त्याची वाच्यता करायची कुठे असाही सवाल उद्योजकांसमोर उभा ठाकला आहे. आता सप्लाय चेन खंडित झाल्या आहेत. उद्योजकांकडे असलेल्या ठेवी आता संपत आल्या आहेत. बँकांची वसुली थांबत नाही, व्याज थांबत नाही, पगार थांबत नाही, वाहतूक खर्च वाढला आहे, अशा परिस्थितीत राज्य सरकारने मोठ्या सोडा, पण छोट्या व्यावसायिकांनासुद्धा कवडीचीही मदत केली नाही. स्वबळावर उभारी घेतली असताना आता उद्योगांना उतरती कळा लागली आहे.

हेही वाचा: अर्थसंकल्पाआधी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्सची मोठी उसळी

''कच्चा मालाच्या वाढलेल्या दरात उद्योजकांना नवीन ऑर्डर मिळणे कठीण झाल्याने उद्योजकांनी उत्पादन कमी केलेले आहे. परिणामी, ४० टक्के उत्पादन ठप्प झाले आहे. तसेच पुरवठा केलेल्या मालाची देयकेही राष्ट्रीयकृत संस्था, शासकीय संस्थाकडून वेळेत मिळत नाहीत. त्याची वाच्यता करायची कुठे असाही सवाल उद्योजकांसमोर आहे.''

- चंद्रशेखर शेगावकर, अध्यक्ष, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन

''कच्चा मालाचे दर वाढल्याने उद्योगांना काही सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या जुन्याच दरात काम करण्याची सक्ती करीत आहे. ते परवडणारे नसल्याने नवीन ऑर्डर मिळणे कठीण झालेले आहे. परिणामी उद्योग अडचणीत सापडलेले आहेत.''

- नितीन लोणकर, माजी अध्यक्ष बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशन

Web Title: Nagpur Entrepreneur Dream Undermined 40 Percent Production Halted

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top