
नागपूर : नागपूर हे देशाच्या हृदयस्थानी असून दळणवळणाच्या सर्व सोयीसुविधा व आंतरराष्ट्रीय विमानतळ ही बलस्थाने आहेत. हे लक्षात घेता नागपूर हे एक्स्पोर्ट हब म्हणून विकसित करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी विमला.आर यांनी आज केले.
उद्योगभवनात आयोजित एक दिवसीय एक्सर्पोटर्स कॉनक्लेव्हच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मिहानचे विकास आयुक्त डॉ.व्ही सरमन, विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ कॉन्सिलचे (वेद) अध्यक्ष शिवकुमार राव, विदर्भ इन्डस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश राठी, उद्योग सहसंचालक ए. पी. धर्माधिकारी, मिहानचे मुख्य व्यवस्थापक संतोष कुमार सिंग उपस्थित होते. त्या पुढे म्हणाल्या, नागपूर हे शहर भौगोलिकदृष्ट्या वाहतुकीसाठी सोयीचे आहे.
मिहान आणि इतर परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. पायाभूत सुविधा, दळणवळणाची साधने व उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण असल्याने निर्यातक्षम उत्पादकांना त्यांचा माल जगभर पाठविता येईल. सर्व क्षेत्रातील व्यावसायिकांना चांगली संधी आहे. त्यांनी गुंतवणूक करावी असेही त्या म्हणाल्या.
“पोन्टेशिअल फॉर एक्सपोर्टस फ्रॉम विदर्भा” या विषयावर शिवकुमार राव यांनी प्रकाश टाकला. विदर्भात अनेक जिल्हयात खनिजासह, कृषी उत्पादने तसेच ॲटोमोबाईलचे स्पेअर पार्ट व अन्य बाबीचे दर्जेदार उत्पादन होतात. त्यात संत्री व भिवापूरी मिरची तसेच टसर साड्यांसाठी इथे भौगोलिक मानांकन मिळालेले जिल्हे आहेत.
गेल्या काही वर्षात दळणवळणाच्या सोयीने जग हे एक खेडे झाले आहे. त्यामुळे इथल्या उत्पादकांनी त्यांचा माल व उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी निर्यात करणे गरजेचे आहे. निर्यातीतील वाटा उचलण्यासाठीही नागपूर शहर सज्ज आहे. दरम्यान, निर्यातीच्या संधीवर सनदी लेखापाल वरुण विजयवर्गी, अपेडाच्या योजनांवर पी. ए. बामणे यांनी मार्गदर्शन केले.
रेल वाहतूक, रस्ते वाहतूक, हवाई वाहतूक यांच्यासह शहराजवळील ड्राय पोर्टचा उपयोग करून देशांतर्गत आणि देशाबाहेर कृषी उत्पादने पुरविणे सुलभ होणार आहे. येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन रात्री परदेशात जाणाऱ्या विमानातून दोहा, दुबई, अबुधाबी येथे फळे, भाज्या निर्यात केल्या जातात. निर्यातीसाठी भारताला खरोखर आत्मनिर्भर करण्यासाठी मोठ्या, मध्यमसह लघू उद्योगांनी पुढे यावे.
- ए. पी. धर्माधिकारी, उद्योग सहसंचालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.