Nagpur : निर्दयी पित्यानेच केली मुलीची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Nagpur : निर्दयी पित्यानेच केली मुलीची हत्या

नागपूर : कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत निर्दयी बापाने आपल्या पोटच्या पोरीला फाशीचा बनाव करण्याचे सांगून तिचा खून केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

गुड्डू छोटेलाल रजक (वय ४० रा. कळमना गाव) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुड्डू याचा आरती सोबत विवाह झाला होता. तिच्यापासून त्याला दोन मुली झाल्या. त्याने २०१८ मध्ये कौशल्या पिपरडे हिच्याशी दुसरे लग्न केले. मात्र, त्याच्या विचित्र स्वभावामुळे तीही त्याला सोडून माहेरी गेली. दरम्यान ६ नोव्हेंबरला माही गुड्डू रजक (वय १६) हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची सूचना पोलिसांना मिळाली.

तपासात त्यांना सुसाईड नोटही मिळाली. त्यात तिने मामाकडून सातत्याने छेडखानी होत असून सावत्र आई कौशल्या पिपरडे, आजोबा दशरथ पिपरडे आणि आजी कल्पना पिपरडे यांच्याकडून शारीरिक आणि मानसिक छळामुळे आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक केली होती. तपासात पोलिसांनी गुड्डू रजक याचा मोबाइल तपासला असता त्याने काही फोटो डिलिट केल्याचे दिसून आले. पोलिसांनी तांत्रिक मदतीने ते फोटो मिळविले.

त्यात माही गळफास घेत असल्याचे फोटो असल्याचे आढळले. त्यामुळे गुड्डूला ताब्यात घेत त्याला विचारणा केली असता, त्यानेच तिच्याकडून अशाप्रकारची सुसाईड नोट तयार करीत, माहीला गळफास घेण्याचे नाटक करण्यास सांगितले. टेबलवर उभे करीत, तिला गळ्यात दोरी टाकण्यास सांगितले. तिने तसे करताच, त्याने टेबल पाडला. त्यामुळे गळ्याला फास लागून तिचा मृत्यू झाला. मात्र, याबाबत छोट्या मुलीला काहीही न सागण्यास सांगितले. गुड्डूच्या मोबाइलमध्ये आढळलेल्या फोटोतून त्यानेच मुलीची हत्या करीत पत्नीच्या कुटुंबाला फसविण्याकरिता हा बनाव केल्याचे उघडकीस आले.

दोन्ही मुलींना कटात केले सामील!

गुड्डूने माही आणि लहान मुलगी खुशीला कौशल्या आणि तिच्या कुटुंबाला धडा शिकविण्याच्या कटात सामील केले होते. त्याने त्यांना केवळ गळफास लावल्याचा बनाव करायचा आहे. फोटो काढून त्यांच्या कुटुंबाला अडकवू, असे सांगितले होते. त्याने सांगितल्यानुसारच माहीने सुसाईड नोट लिहिली होती. गुड्डूने स्वत: फास तयार केला होता. लहान मुलीला मोबाईलवर फोटो काढण्यास सांगितले. माहीने प्लॅस्टिकच्या स्टूलवर चढून गळ्यात तो फास टाकला. काही फोटो काढल्यानंतर गुड्डूने स्टूलला लाथ मारून खाली पाडले. माहीला गळफास लागला आणि तिचा मृत्यू झाला.