
नागपूर : आर्थिक व्यवहारावर ‘वॉच’
नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भाव आणि कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे एसटी महामंडळ आर्थिक संकटात सापडले आहे. संपानंतर एसटी पुन्हा रस्त्यावर धावू लागली आहे. अशा स्थितीत परिवहन विभागाच्या कोणत्याही विभागात आर्थिक गैरव्यवहार होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे. एसटीचे उत्पन्न सुरक्षित राहावे यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
नागपूर विभागात एसटी महामंडळ प्रशासनाने भरारी पथक यंत्रणा अधिक सक्षम केली आहे. यात आता अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर पर्यवेक्षकांना वाढविण्यात आली आहे. पूर्वी ८ पथक होते. त्यात एक पथक आठवड्यातून एक दिवस सुटीवर राहत होते. मात्र, आता एसटीची आर्थिक स्थिती लक्षात घेता आणि महामंडळाचे उत्पन्न सुरक्षित राहावे म्हणून या यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे. त्यात अधिकाऱ्यांसह आणखी ३ पथकात वाढ करण्यात आली. हे सर्व पथक नागपूर विभागातील विविध मार्गावर तैनात राहतील. याशिवाय इतर साहित्यातील खरेदीतही गैरव्यवहार होणार नाही यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. याशिवाय मार्गावरील कोणत्याही बसमध्ये अकस्मात भेट देऊन प्रवाशांची तपासणी करून वाहकाकडून तिकिटाची चौकशी करतील.
संपापूर्वी तिकिटात गैरव्यवहारासह इतरही प्रकाराच्या तीन ते चार घटना उघडकीस यायच्या. आता मात्र, परिस्थिती एसटी महामंडळाची व कर्मचाऱ्यांची बदलली आहे. कोरोना आणि संपामुळे एसटीचे उत्पन्न थांबले होते. चालक-वाहकासर सर्वच कर्मचारी गेल्या अडीच वर्षापासून आर्थिक कोंडीत सापडले होते. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये गैरव्यवहार होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे. कोणताही अपहार होऊ नये तसेच एसटीचे उत्पन्न सुरक्षित राहावे, म्हणून प्रशासनाने भरारी पथकात वाढ केली आहे.
कामात पारदर्शिकता राहणार
वाहकाने कामात हलगर्जीपणा करू नये, प्रत्येक प्रवाशाचे तिकीट काढलेच पाहिजे यावर लक्ष ठेवण्यासाठी आणखी तीन पथके वाढविली असून ती आता ११ एवढी झाली आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून गैरव्यवहार होणार नाही. अशी अपेक्षा महामंडळाला आहे.
भरारी पथकाची संख्या वाढविली आली आहे. सध्याची स्थिती लक्षात घेता महामंडळाचे उत्पन्न सुरक्षित राहावे व वाहकांकडून अपहार होऊ नये. यासाठी हा प्रयत्न आहे.
- नीलेश बेलसरे, विभागीय नियंत्रक
Web Title: Nagpur Financial Transactions Watch Special Campaign Launched
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..