
नागपूर : अजनी स्टेशनवर आग, मेट्रोही थांबवली
नागपूर : मेट्रोच्या अजनी स्टेशन ते छत्रपती चौक ट्रॅकदरम्यान असलेल्या केबलला आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचे कळताच स्टेशनवरील नियंत्रण कक्षाने मेट्रोच्या चालकालाही कळविले. त्यामुळे या मार्गावरील मेट्रो काही काळ थांबविण्यात आली होती.
मेट्रो ट्रॅकच्या बाजूलाचा संरक्षक भिंतीला लागून केबलचे जाळे एका स्टेशनपासून दुसऱ्या स्टेशनपर्यंत पसरले आहे. अजनी स्टेशनला अगदी लागूनच या केबलला अचानक आग लागली. त्यामुळे अजनी मेट्रो स्टेशनवरील स्टेशन नियंत्रक व इतर अधिकाऱ्यांत धावपळ माजली. मेट्रोच्या फेऱ्या दर पंधरा मिनिटांनी असल्याने स्टेशन नियंत्रकाने मेट्रोचालकाला कळविले. त्यामुळे मेट्रोचा पुढील प्रवास रोखण्यात आला. काही अधिकाऱ्यांनी वीजेचा प्रवाह बंद केला.
दरम्यान, आगीची माहिती तत्काळ अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन विभागाच्या नरेंद्रनगर केंद्रावरून दोन आगीचे बंब तत्काळ अजनी मेट्रो स्टेशनजवळ पोहोचले. अग्निशमन यंत्रणा उत्तम असल्याने तत्काळ अग्निशमन जवानांनी आगीचे ठिकाण गाठले व पाण्याचा मारा केला. काही क्षणातच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आग विझविल्यानंतर मेट्रो पूर्ववत सुरू करण्यात आली. महामेट्रोकडून आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. अधिक तापमानामुळे केबल जळाले काय? या दिशेनेही महामेट्रो तपास करीत आहे.
२५ कोटींचे केबल बचावले
या आगीत महामेट्रोचे १० लाखांचे केबल जळाले. हे केबल अजनी चौक ते छत्रपती चौकापर्यंत आहेत. अग्निशमन जवानांनी तत्काळ आग विझविल्यामुळे पुढील केबल बचावले. आगीपासून वाचलेल्या केबलची किंमत २५ कोटी रुपयांची आहे.
Web Title: Nagpur Fire At Ajni Station 10 Lakh Cable Burnt Metro Stopped
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..