Nagpur : लग्नाचा बार पाच हजार कोटींचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wedding

Nagpur : लग्नाचा बार पाच हजार कोटींचा

नागपूर : तुळशी विवाह आटोपल्यानंतर लगीनघाईचे दिवस सुरु होणार आहेत. आठ महिन्यांच्या काळात ४६ लग्नतिथी आहेत. दोन वर्षाच्या कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर मुक्त वातावरणात नागपूर शहरात ७५०० लग्न सोहळे होणार आहेत. त्यामुळे कपड्यांसह सराफा बाजार, इव्हेन्ट मॅनेजमेंट, कॅटरर्सच्या व्यवसायाला पुन्हा झळाळी मिळणार असून अंदाजे पाच हजार कोटींची उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दिवाळीनंतर तुळशी विवाह होताच लग्न समारंभाला सुरवात होते. २० नोव्हेंबरनंतर लग्नाचे बार उडणार आहे. त्यादृष्टीने बाजारपेठ सज्ज झालेल्या आहेत. कोरोनामुळे सलग दोन वर्ष या व्यवसाय अडचणीत सापडला होता. आता लॉन, इव्हेन्ट कंपन्या, कॅटरर्स, सभागृह, डीजे, बँड, घोडा यांच्यासोबतच पंडितांच्या व्यवसायाला बूस्ट मिळणार आहे.

लग्नाचा बार पाच हजार कोटींचा

दिवाळीच्या सणासुदीत जोमाने व्यवसाय झाल्याने नागपूरसह देशभरातील व्यापाऱ्यांनी लग्नसराईतही चांगल्या व्यवसायाची अपेक्षा आहे. देशभरात सुमारे ३२ लाख लग्न सोहळे पार पडण्याचा अंदाज आहे. प्रत्येक लग्नाचा सुमारे २० टक्के खर्च वधू-वरांवर जातो, तर ८० टक्के खर्च विवाह सोहळ्यात काम करणाऱ्या अन्य एजन्सींना जातो. त्यामुळे लग्नसराईच्या हंगामानेही मोठ्या व्यवसायाचे स्वरूप मोठे झाले आहे. मागील वर्षी शहरात साडेपाच हजार विवाह झाल्याची आकडेवारी व्यापारी आणि सेवा पुरवठादारांच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

कोरोनाच्या दोन वर्षाच्या अस्थिरतेच्या वातावरणानंतर यंदा विवाहाचे उत्साह जोरात राहणार आहे. त्यामुळे कोट्यावधीची उलाढाल अपेक्षित आहे.

दीपेन अग्रवाल, अध्यक्ष, कॅमेट

वर्ष देशातील विवाह उलाढाल

२०२२ ३२ लाख ३.७५ लाख कोटी

२०२१ २५ लाख ३ लाख कोटी

नागपूर

२०२२ ७५०० ५ हजार कोटी

२०२१ ५३०० ३ हजार ७०० कोटी

लग्नाच्या वेळी विविध प्रकारच्या सेवांनाही मोठा व्यवसाय मिळतो. त्यात तंबू सजावट, फ्लॉवर डेकोरेशन, क्रॉकरी, खानपान सेवा, प्रवासी सेवा, कॅब सेवा, व्यावसायिक गटांचे स्वागत, भाजी विक्रेते, छायाचित्रकार यांचा समावेश आहे. इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीसाठी हा एक मोठा व्यवसाय म्हणून उदयास आला असून उत्पन्नाचा मोठा स्रोत झालेले आहे.

- बी.सी. भरतीया, राष्ट्रीय अध्यक्ष, कॅट

लग्नसराई सुरु होणार आहे. त्यासाठी आतापासूनच बुकिंग सुरु झाली आहे. लग्नसोहळ्यांमुळे अनेकांना रोजगार मिळतो. शहरात एका मोसमात हजारो लग्न होतात. दोन वर्षाच्या कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर लग्न सोहळे उत्साहाने होणार असल्याने यंदा व्यवसायाला सुगीचे दिवस येतील.

- विजय तलमले, अध्यक्ष,नागपूर मंगल कार्यालय ॲण्ड लॉन्स असो.