
नागपूर : चारशेवर अंगणवाड्या 'शौचालयविना'
नागपूर : एकात्मिक बाल विकास अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाड्यांमधून बालकांना पोषण आहारसोबत प्राथमिक शिक्षणही देण्यात येते. जिल्ह्यातील तब्बल ५५८ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नसून ४१६ वर अंगणवाड्यांमध्ये शौचालयाची व्यवस्थाही नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
बालकांचे प्राथमिक शिक्षणापूर्वीचे शिक्षण हे अंगणवाड्यांमध्ये होत असते. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभाग अंतर्गत २४२३ अंगणवाड्या कार्यरत आहेत. यामध्ये २१६१ नियमित व २६२ मिनी अंगणवाड्यांचा समावेश आहे. यापैकी ५३८ अंगणवाड्यांना स्वत:ची स्वतंत्र इमारतच नाही. त्यामुळे त्या सरकारी शाळा, समाजमंदिर, ग्रामपंचायत कार्यालय किंवा भाड्याच्या खोलीत भरतात. भाड्याने घेतलेल्या अंगणवाड्यांचे भाडे पूर्वी अतिशय कमी असल्याने काही ठिकाणच्या अंगणवाड्यांचे चित्र जनावरांच्या कोंडवाड्यासारखेच होते.
आता भाड्यात शासनाने ७५० रुपये इतकी वाढ केली आहे. बालवयातील मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षणाबरोबरच त्यांचे पोषण करण्याचे काम अंगणवाडीच्या माध्यमातून करण्यात येते. नियमानुसार १ हजार लोकसंख्येमागे एक अंगणवाडी सुरू करता येते. अंगणवाडीला मुलांच्या संख्येचे बंधन नसते. मुलांना पोषण आहार देण्याबरोबरच आरोग्यासह अन्य कामेही अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या माध्यमातून केली जातात.
महिला व बाल कल्याण विभागाचे या अंगणवाड्यांवर नियंत्रण असते. अंगणवाडीला स्वतंत्र इमारत बांधून देण्यासाठी शासनाकडून निधी दिला जातो. स्वत:च्या इमारतीत नसलेल्या अंगणवाड्यांची अवस्था वाईट आहे. ज्या ठिकाणी अंगणवाडी सुरू करण्यासाठी काहीच सुविधा नाही, तिथे भाड्याने अंगणवाडी सुरू केली जाते. जिल्ह्यातील बहुतांश मिनी अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत नाही. अंगणवाड्यांमध्ये ९४ सेविकांची तर २०६ मदतनीसांची पदेही रिक्त आहेत.
एकूण अंगणवाड्या २४२३
स्वतंत्र इमारत असलेल्या २०६९
स्वतंत्र इमारत नसलेल्या ५३८
शौचालय असलेल्या १९०३
शौचालय नसलेल्या ४१६
डीपीसीच्या निधीच्या माध्यमातून अंगणवाड्यांची डागडुजी तसेच १०५ स्वतंत्र नवीन अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. ही कामे प्रगतीपथवर आहेत. डीपीसीकडून याकरिता आठ कोटीवरचा निधीही मंजूर झाला आहे.
- भागवत तांबे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास विभाग, जि.प.
Web Title: Nagpur Four Hundred Anganwadi Without Toilets Child Development Department
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..