Nagpur : अभियांत्रिकी व्यवस्थापनाची ‘एफआरए’ मध्ये हेराफेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

Nagpur : अभियांत्रिकी व्यवस्थापनाची ‘एफआरए’ मध्ये हेराफेरी

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांद्वारे प्राध्यापकांचे पगार थकविल्या जात असल्याची माहिती समोर आली. मात्र, त्यासोबत महाविद्यालये शासनाच्या ‘फी रेग्युलेशन ॲथॉरिटी’ला (एफआरए) चुकीची माहिती देत त्यांची दिशाभूल करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालयांना अभ्यासक्रमांचे शुल्क निर्धारण करताना, महाविद्यालयातील इन्फ्रास्ट्रक्चर, महाविद्यालयात असलेले नियमित प्राध्यापक आणि मेंटनन्स खर्च दाखवावा लागतो. त्यानुसार अभ्यासक्रमांचे शुल्क निर्धारित करण्यात येत असते. त्यासाठी बहुतांशी महाविद्यालयांद्वारे ‘इन्फ्रास्ट्रक्चर'ची सोय करण्यात येत असते. मात्र, बहुतांशी महाविद्यालयांद्वारे कंत्राटी शिक्षकांना नियमित शिक्षक असल्याचे दाखविण्यात येते.

त्यानुसार त्यांना वेतनश्रेणीप्रमाणे पगार देण्यात येत असल्याचेही नमूद करण्यात येते. याशिवाय काही महाविद्यालये नियमित प्राध्यापकांची कागदावर वेतनश्रेणी दाखवीत प्रत्यक्षात अर्धाही पगार देत नसल्याचे दिसून येते. मात्र, याचा फायदा घेत, महाविद्यालयांद्वारे अभ्यासक्रमांचे शुल्क वाढवून घेण्यात येते. याचा फायदा शिष्यवृत्तीसाठीही महाविद्यालयांना होत असतो. मात्र, यामुळे सातत्याने राज्याच्या शुल्क निर्धारण समितीची फसवणूक होत असल्याचे दिसून येते.

महाविद्यालयांच्या तपासणीत उघड

गेल्या दोन महिन्यांपासून विद्यापीठाच्या विशेष समितीमार्फत विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या दहा महाविद्यालयांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये समितीला काही महाविद्यालयातील प्राध्यापक नियमित असताना, त्यांच्या खात्यात तेवढा पगार जमा होत नसल्याचे दिसून आले. मात्र, शुल्क निर्धारण समितीकडे त्यांचा वेतनश्रेणीनुर पगार होत असल्याचे दाखविण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे या महाविद्यालय व्यवस्थापनाकडून राज्याच्या ‘फी रेग्युलेशन ॲथॉरिटी‘ला चुकीची माहिती देण्यात येत असल्याची बाब उघड झालेली आहे.

हेही वाचा: Nagpur : एमबीएचे प्राध्यापक वाणिज्य महाविद्यालयांचे प्राचार्य!

विद्यापीठाकडूनही विचारणा

शुल्क ठरवीत असताना, त्याबाबत देण्यात आलेली माहिती चुकीची असल्याची बाब समितीला निदर्शनास आली असताना, त्याबाबत महाविद्यालयांना विचारणा करणारे पत्र विद्यापीठाकडून पाठविण्यात आले. त्यापैकी काही महाविद्यालयांनी पत्राला उत्तर दिले आहे. मात्र, अद्यापही काही महाविद्यालयांनी माहिती देण्यासाठी वेळ वाढवून मागितला आहे.

विशेष समितीच्या तपासादरम्यान बऱ्याच गोष्टी समोर आलेल्या आहेत. त्याबाबत विद्यापीठाच्या समितीद्वारे व्यवस्थापन परिषदेमध्ये वेळोवेळी मुद्दे उचलण्यात येईल. समितीच्या अहवालात सविस्तर गोष्टी समोर येईल.

डॉ.नितीन कोंगरे,

सदस्य, व्यवस्थापन परिषद.

Web Title: Nagpur Fraud Of Engineering Management In Fra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :ENGINEERING COLLEGE